शेतकऱ्यांमध्ये आनंद:
अकोला: मृग नक्षत्रात प्रारंभी समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने प्रारंभी शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. त्यानंतर आठवडाभरापासून दडी मारल्याने उगवलेली पिके संकटात सापडली होती. दरम्यान, रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली असून, शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. जिल्ह्यात मूर्तिजापूर, पातूर, बोरगाव मंजू, कानशिवणी, वाहाळा बु., वाडेगाव, दिग्रससह बाळापूर तालुक्यात वादळ वाऱ्यासह पाऊस बरसला.
-----------------------
मूर्तिजापूर तालुक्यातील निंभा येथे रोहित्रावर कोसळली वीज
मूर्तिजापूर: तालुक्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. निंभा येथे वीज रोहित्रावर वीज कोसळल्याने काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.
तालुक्यात गत दहा दिवसांनंतर पावसाने तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हजेरी लावली असून, निंभा येथे वीज रोहित्रावर वीज कोसळल्याने गावातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे पथदिवे फुटून खाली पडले, तर नागरिकांना विजेचा सौम्य धक्का बसल्याची माहिती आहे. तालुक्यातील चिखली, गोरेगाव, गाजीपूर, सालतवडा, समशेरपूर, आमतवाडा, शेलू बाजार, दुधलम, हातगाव जामठी, निंभा येथे पावसाने हजेरी लावली. तालुक्यात अनेक ठिकाणी पेरणी झाली असली, तरी काही भागात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. तुरळक ठिकाणी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला आहे तर ७५ टक्के पेरणी व्हायची असल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.
-----------------------
कानशिवणी परिसरात पेरणीला येणार वेग
बोरगाव मंजू: मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. परिसरात केवळ ५ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली होती. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान, रविवारी कानशिवणीसह बोरगाव मंजू परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उगवलेल्या पिकांना संजीवनी मिळाली, तर रखडलेल्या पेरण्या पुन्हा सुरू होणार असल्याचे शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.
--------------
गतवर्षी खरीप हंगामातील नगदी पीक असलेले मूग, उडीद हातचे गेले होते. यंदा चांगला पाऊस असल्याने चांगले उत्पादन होण्याची आशा होती. दरम्यान, पावसाने दडी मारल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
-हरिभाऊ चिलवंते, शेतकरी, कानशिवणी.