लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात अकोट व तेल्हारा तालुक्यासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.वादळासह पाऊस झाल्याने अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. अकोट तालुक्यात व शहरात गुरुवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. तर विद्युत बिघाड झाल्याने वीज पुरवठा चार तास बंद पडला होता. अकोट तालुक्यात पहिला पाऊस पडल्याने वातावरणात गारवा आला; पंरतु दमट वातावरणामुळे पुन्हा उकाडा होऊ लागला. एकदम पाऊस आल्याने लघू व्यावसायिक व बाजार समितीमध्ये धावपळ झाली. बाजार समितीमध्ये तूर गोदामात व इतर धान्य टिनशेडमध्ये टाकण्यास ट्रॅक्टरमधील धान्य ताडपत्रीने झाकण्याकरिता धावपळ झाली. पावसामुळे शेतकरी थोडाफार सुखावला आहे. वृत्त लिहिस्तोवर ढगाळ वातावरण होते. तेल्हारा शहरासह तालुक्यात १ जून रोजी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडल्याने शेत पिकांचे नुकसान झाले. संध्याकाळी आलेल्या अचानक वादळी वाऱ्याने लोणच्याचे आंब्याच्या कैऱ्या पडून जास्त नुकसान झाले. त्याचप्रमाणे भुईमूग काढणी सुरू असल्याने आधीच कमी उत्पन्न, त्यात अचानक आलेल्या वादळी पावसाने मोठी धांदल उडाली व हाती येणाऱ्या पिकांचे नुकसान झाले. तसेच विद्युत पुरवठा काही तास बंद होता. तेल्हारा तालुक्यातील सौंदळा व परिसरातही जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. हिवरखेड व शिर्ला येथे तुरळक पाऊस झाला.
जिल्ह्यात विविध ठिकाणी पाऊस
By admin | Published: June 02, 2017 1:40 AM