अकोला : परतीच्या पावसाचे दमदार आगमन झाले असून, हा पाऊस तूर, पर्हाटी (कापूस) या पिकाला पोषक ठरणार असल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दोन महिने पावसाची झळ बसलेल्या या पिकाला सध्या बहर आला आहे. कापसाला फुले, पात्या धरल्या आहेत, तर तूर डोलू लागली आहे. ५ सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून, अनेक जिल्हय़ात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यात दुष्काळी जिल्हय़ाचा समावेश असल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कृषी हवामान शास्त्रज्ञांच्या मते या महिन्यात पाऊस अपेक्षित असून, या पुढे दुष्काळीपट्टय़ात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात चांगला, तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातही काही काळात पाऊस येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून मान्सून परत जाण्यासंदर्भातील २00५ ते २0१४ दरम्यानचा अभ्यास करून ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञांच्या मते, यावर्षी १५ ते २0 ऑक्टोबरपर्यंत मान्सून परतण्याची शक्यता आहे. या काळात अचानक ढग जमा होतात व पाऊस कोसळतो. त्यामुळे आणखी एक महिना मान्सून आणि मान्सूनेत्तर पावसाचा कालावधी राहणार आहे. याशिवाय नोव्हेंबर महिन्यातही अवेळी पावसाची शक्यता आहे. २0१३-१४ मध्ये परतीच्या पावसाने चांगला दिलासा दिल्याने रब्बी पिकाला हा पाऊस पोषक ठरला होता. यावर्षी १५ सप्टेंबरला परतीचा पाऊस सुरू झाला असून, दोन ते तीन दिवसाआड पाऊस कोसळत असल्याने या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होईलच शिवाय खरीप हंगामातील पर्हाटी (कापूस) आणि तूर या पिकाला पोषक ठरणार आहे. दोन महिने पावसाचा खंड पडल्याने या दोन्ही पिकांची वाढ खुंटली होती तथापि गत आठ-आठ दिवसापासून अधून-मधून पडत असलेल्या या पावसामुळे पर्हाटीला फुले, पात्या धरल्या असून, तूर पीक डोलू लागले आहे. ज्या शेतकर्यांनी ऑगस्टमध्ये सोयाबीन पेरणी केली, त्या सोयाबीन पिकाला हा पाऊस पोषक ठरत असून, शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनलाही फायदा होणार आहे. परतीचा पाऊस रब्बी पिकांना पोषक तर ठरेलच खरीप हंगामातील पर्हाटी (कापूस), तूर या पिकाला परतीचा पाऊस दिलासादायक ठरला आहे. यामुळे ही दोन्ही पिके चांगली येतीलच शिवाय शेंगा भरण्याच्या अवस्थेत असेलल्या सोयाबीनलाही पोषक ठरणार असल्याचे कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.दिलीप मानकर यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले.
परतीचा पाऊस तूर, प-हाटीला पोषक!
By admin | Published: September 17, 2015 11:18 PM