लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ऐन खरीप हंगामातील पीक काढणीच्या हंगामातच पावसाने दणका दिल्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी, फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, सणासुदीच्या दिवसांत पश्चिम विदर्भातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.जवळपास आताच ४० टक्क्यांच्यावर उत्पादन घटल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.गत आठ ते दहा दिवसांपासून पश्चिम विदर्भात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. सद्यस्थितीत सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. शेतात कपाशीचे पीकही फुलले आहे; परंतु सारखा पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेले सोयाबीन शेतातच सडले असून, त्याला कोंब फुटले आहेत.ज्वारी, कपाशीची बोंडे काळी पडली आहेत. कपाशी परिपक्क होण्याअगोदरच बोंडांमधून कपाशी बाहेर आली. पावसामुळे पपई, लिंबू, संत्रा फळपिकाला फटका बसला असून, पपई आणि लिंबू पिकाची फळगळ झाली आहे.अंबिया बहारातील संत्र्याचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी पिकांच्या वाढीच्या अवस्थेतच सतत दीड महिना पाऊस सुरू राहिल्याने पिकांची वाढ खुंटली.कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना कीड, रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वारंवार फवारणीचा खर्च करावा लागला. मूग, उडीद अगोदरच हातचा गेल्याने सर्व भिस्त कपाशी, सोयाबीन व तूर या पिकांवर आहे; परंतु ऐन काढणीच्या वेळेसच सतत दहा दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने शेतकºयांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने सणासुदीच्या दिवसांत शेतकरी हवालदिल झाला आहे.सोयाबीनला कोंब फुटले! सोयाबीन परिपक्च झाल्यानंतर सतत आठ ते दहा दिवस पाऊस राहिल्यास सोयाबीनला कोंब फुटतातच. तोच प्रत्यय शेतकºयांना येत आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन काढून शेतातच ठेवण्यात आले आहे. पावसामुळे शेतात जाता येत नसल्याने सोयाबीनला कोंब फुटले असून, प्रत खराब झाली आहे.
दहा दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने सोयाबीनला कोंब फुटण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हे घडले आहे. कपाशी पिवळी पडली आहे. या वातावरणाचा तूर पिकावरही कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शेतकºयांनी काढणीला आलेल्या पिकाचे संरक्षण करावे.- डॉ. दिलीप मानकर, संचालक, विस्तार, शिक्षण,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.