मंगळवारी तौउते चक्रीवादळ गुजरात सीमेवर पोहोचले व आपल्या उच्चतम स्थितीपर्यंत पोहोचत आहे. वादळाचे विस्तारित टोक/घेर विदर्भापर्यंत पोहोचला आहे. मागील तीन दिवसांपासून या चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्यात दिसून येत आहे. रविवारी जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रविवारी झालेल्या नुकसानीनंतर मंगळवारी पुन्हा सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. रात्री ७ वाजेच्या सुमारास शहरात जोरात वादळी वारा सुटला होता. अर्धा तास पावसाच्या सरी कोसळल्या. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्यांवरील झाडे उन्मळून पडली. ग्रामीण भागातही मोठे उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, यापुढेही वातावरण ढगाळलेले, उष्ण-दमट राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
--बॉक्स--
वीज खांब कोसळला!
वादळी वारा सुटल्याने शहरातील वीजपुरवठा सायंकाळी ७ पासून खंडित झाला होता. गांधी चौकातील वीज खांब उखडून खाली पडला. मोठ्या प्रमाणात वीज तारा तुटून पडल्या होत्या.
--बॉक्स--
वातावरणात गारवा
कडक निर्बंध असल्याने नागरिक घरातच आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचा तडाखा बसत नसला तरी उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवत होता. अर्धा तास पाऊस कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
--बॉक्स--
उन्हापासून बचावासाठी उभारलेले मंडप कोसळले!
कडक निर्बंध असल्याने शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांना उन्हापासून बचावासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे मंडपही कोसळले.
--बॉक्स--
झाड पडल्याने घरासह दुकानांचे नुकसान
शहरातील जयहिंद चौकातील जुने पिंपळाचे झाड उन्मळून पडले. यामुळे ८-१० दुकानांचे नुकसान झाले व एका घराच्या भिंती कोसळल्या. यावेळी सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
--बॉक्स--
पोपट गतप्राण; वादळाचा फटका
वाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने याचा फटका सर्वसामान्यांसह पोपट पक्ष्यांना बसला. काही ठिकाणी पोपट गतप्राण अवस्थेत आढळले. वादळाचा फटका बसलेल्या एका पोपट पक्ष्याला सीटी कोतवाली ठाण्याच्या कर्मचाऱ्याने जीवदान दिले.
--बॉक्स--
येथे झाडे उन्मळून पडली!
पोलीस वसाहतीच्या मागे उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांवर झाड कोसळल्याने नुकसान झाले. देवी पोलीस लाइनजवळ, गांधी रोडवरील पेट्रोल पंपाजवळ, बी. आर. हायस्कूलजवळ व वर्धमान हॉस्पिटलजवळ झाड उन्मळून पडले होते.