- संतोष येलकरअकोला - जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी - नाल्यांना पूर आले असून, पुलावरून पाणी वाहत आहे. जिल्ह्यातील विविध भागांत पुराचे पाणी अनेक घरांत घुसले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
शुक्रवारी रात्रीपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाला. शनिवारी सकाळपासून आणखी धो - धो पाऊस बरसत आहे. सतत जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच भागांत नदी - ओढे व नाल्यांना पुर आले. त्यामध्ये काही गावांत पुलांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक भागांत पुराचे पाणी घरांमध्ये घुसल्याने घरांच्या नुकसान झाले असून, घरांमधील विविध वस्तू पुरांत वाहून गेल्या.पुरात वाहून गेलेल्या ' त्या ' दोघांना वाचविले!जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी शिवारातून पुरात वाहून गेलेल्या दोघांना शोध व बचाव पथकाने वाचविले, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जिल्हा समन्वयक संदीप साबळे यांनी सांगितले.
वाहतूक बंद; जनजीवन विस्कळीत !सतत बरसत असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात नदी - नाल्यांना पूर आले असून , पुलांवरुन पुराचे पाणी वाहत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांच्या रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली असून, जनजीवन विस्कळित झाल्याचे चित्र आहे. अकोला शहरातही रस्ते जलमय!अकोला शहरात सकाळपासून सतत जोरदार बरसत असलेल्या पावसामुळे अकोला शहरातील विविध भागांत रस्ते दुपारपर्यंत जलमय झाले. शहरातील उमरी, मलकापूर , वाशिम रोड बायपास, खडकी, शिवसेना वसाहत, डाबकी रोड आदी परिसरात रस्ते पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे.
पिके बुडाली पाण्यांत; शेतकरी हवालदिल!सतत बरसणारा पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात सर्वत्र शेतात पाऊस आणि पुराचे पाणी साचले असून, पिके पाण्यात बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पेरणीनंतर उगवलेली पिके पाण्यात बुडाल्याने पेरणीसाठी केलेला खर्च पाण्यात गेल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे.