अकोला: शहरासह जिल्ह्यात गुरुवारी धुव्वाधार पाऊस झाल्याने सर्वत्र हाहाकार उडाला होता. सकाळपासूनच पाऊस सुरू असल्याने, जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी पुन्हा अकोला, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा तालुक्यात पावसाचा तडाखा बसला असून, तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता.
तेल्हारा तालुक्यातील नाल्याला पूर आल्याने, तेल्हारा-पाथर्डीमार्गे अकोट व तेल्हारा-वरवटचा संपर्क तुटला, तसेच मुंडगाव येथील चंद्रिका नदीला पूर आल्याने, अमिनापूर, सुल्तानपूर, वणी वरुळा, बळेगाव, आलेगाव, लोहारी आदी गावांचा संपर्क काही काळासाठी तुटला होता. मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथील खोराडी नाल्याला पूर आल्याने मूर्तिजापूर-दहिगाव गावंडे-अकोला मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती, तसेच कमळगंगा नदीला पूर आल्याने मूर्तिजापूर-भातकुली मार्ग बंद झाला होता.
जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पातळीत वाढ!
सार्वत्रिक पावसाने धरण, प्रकल्पांच्या पाण्याची पातळी वाढली असून, घुंगशी बॅरेजेचे दरवाजे उघडण्यात आले होते. पाण्याचा विसर्ग जोरात असल्याने, धरण परिसरासह नदी, नाल्याकाठच्या, तसेच सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महान येथील काटेपूर्णा धरणाचा साठा ५८.६३ टक्क्यांवर पोहोचला आहे.