संतोषकुमार गवई
पातूर: पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित होणे, हे समीकरण पातूर तालुक्यात कायम रुजले आहे. तालुक्यातील महावितरणचा कारभार वाऱ्यावर असून, नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. याकडे महावितणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
पातूर तालुक्यातील दुर्गम भागातील गावांचा वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याची बाब नित्याचीच झाली आहे. त्यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. तसेच वीज कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याच्या गावकऱ्यांच्या तक्रारी आहेत. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी दुसऱ्या दिवसाची दुपार उजाडते. ग्रामीण भागातील गावागावात वीज वितरण कंपनीचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने खासगी अप्रशिक्षित वीजसंबंधी कामे करतात. तालुक्यात कृषी फिडर अद्यापही स्वतंत्र करण्यात आलेले नाही. त्यामुळे वीज ग्राहकांचा वीज पुरवठा रात्र रात्रभर खंडित असतो. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
--------------------------
ट्रान्सफार्मर व कर्मचाऱ्यांची संख्या कमीच
पातूर तालुक्यात ट्रान्सफार्मरची संख्या कमी असल्याने वीज वहनाचा अधिभार अधिक आहे. जुन्या झालेल्या तारा वारंवार तुटत असतात. तसेच महावितरणकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने दुरुस्तीसाठी वेळ जातो. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. सायंकाळी पाऊस आल्यानंतर तेवढ्याच तत्काळ वीज पुरवठा खंडित होतो.
-----------------
पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित होतो. दिवसा खंडित झालेला वीज पुरवठा रात्रभर सुरळीत होत नसल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा.
दीपक इंगळे, ग्रामस्थ, भंडारज बु.
---------------------------------
गावातील वीज पुरवठा खंडित तर होतोच, त्याचबरोबर शेतीची वीज पुरवठा खंडित होत असल्याने सिंचनासाठी अडचण जात आहे. कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.
- शंकर जाधव, रेशीम शेतकरी, पांगरताटी.