अकोला: जून महिना संपत आला तरी अद्याप पाऊस पडलेला नाही. पावसाने दडी दिल्याने पेरणीला विलंब होत असून, हा हंगाम हातचा जातो की काय, अशी चिंता गावागावात शेतकरी व्यक्त करीत आहेत. पावसाच्या विलंबामुळे बाजारपेठही प्रभावित झाली असून, महागाई वाढत आहे. पावसाळ्याला सुरुवात होऊन एक महिना झाल्यावरही पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्हय़ातील पेरण्या खोळंबल्या आहे. गतवर्षी एक जूनपासून पावसाला प्रारंभ झाला होता. त्यामुळे जूनअखेरपर्यंत कपाशी व सोयाबीनचे पीक पात्यावर आले होते. पेरणीला विलंब झाला तर उत्पादनात प्रचंड घट येते. परिणामी शेतकर्यांना नुकसानाचा सामना करावा लागतो. उडीद, मूग पिकाची पेरणी २0 जूनच्या आत झाली तर पिके चांगली येतात. पावसाच्या दडीमुळे यावर्षी हायब्रीड, ज्वारी, उडीद, मुगाची पिके शेतकर्यांच्या हातून गेली असून, आता केवळ कपाशी व सोयाबीनवर शेतकर्यांची मदार आहे. त्यातही आणखी आठवडाभर पाऊस आला नाही तर या पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. गतवर्षी एक जूनपासूनच पावसाला प्रारंभ झाला होता. त्यामुळे यावर्षी शेतकर्यांनी मे महिन्यातच शेतीची कामे आटोपली असून, बियाणे व खताची खरेदी केली आहे. शेतकरी पेरणीसाठी सज्ज असून, दररोज शेतात जाऊन शेताची पाहणी करीत आहेत. अनेक अल्पभूधारक शेतकरी दुसर्यांच्या शेतात जाऊन काम करीत आहेत. शेतकर्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहे. गावागावांमध्ये चिंतामय वातावरण असून, पाऊस कधी येईल, याचीच चर्चा रंगत आहे.
पाऊस रुसला, शेतकरी चिंताग्रस्त
By admin | Published: June 29, 2014 12:33 AM