अकोला : गत दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असून, प्रकल्पांच्या साठ्यातही वाढ होत आहे. परिणामी, जिल्ह्यात ७ पैकी ६ तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६६५.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्यानंतर २४ दिवस पाठ फिरविली. तर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाला. त्यामुळे रखडलेल्या पेरण्या आटोपल्या. याच महिन्यात अतिवृष्टीचाही सामना करावा लागला. मात्र, ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. या महिन्यात पावसाची सरासरीही ओलांडता आली नाही; परंतु दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला आहे. अनेक रस्त्यांवरून वाहतूक बंद आहे. या दोन दिवसांमध्ये सहा तालुक्यांनी जूनपासून ते आतापर्यंतची सरासरी ओलांडली आहे.
तालुकानिहाय पाऊस
तालुका सरासरी पाऊस झालेला पाऊस
अकोट ५९६.९ ६००.८
तेल्हारा ५७७.९ ६९२.८
बाळापूर ५४२.४ ५७४.९
पातूर ७२७.६ ६६१.६
अकोला ६१०.२ ६६३.१
बार्शीटाकळी ६१२.८ ७१२.४
मूर्तिजापूर ६२२.४ ७६४.०
सप्टेंबरमध्ये ३६६.९ टक्के पाऊस
सप्टेंबर महिन्यात १ ते ९ या तारखेत सरासरी ३५.४ मिमी पाऊस होणे अपेक्षित असते; परंतु यंदा या ९ दिवसांत १२९.९ मिमी पाऊस म्हणजेच ३६६.९ टक्के पाऊस झाला. यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक ४६५.१ टक्के पाऊस झाला आहे.
या तालुक्यांनी ओलांडली सप्टेंबरची सरासरी
जोरदार पावसामुळे जिल्ह्यात तीन तालुक्यांनी जून ते सप्टेंबर महिन्याची सरासरी ओलांडली आहे. यामध्ये तेल्हारा तालुक्यात १०४.३ टक्के, बार्शीटाकळी तालुक्यात १०१.८ टक्के तर मूर्तिजापूर तालुक्यात १०७.४ टक्के पाऊस झाला आहे.