अकोला : विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली असून, किमान तापमान सरासरी २0 अंश सेल्सिअसपर्यंंत पोहोचले आहे. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. १६ फेब्रुवारीला विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. यावर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने फेब्रुवारी महिन्यातच कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे. विदर्भातील तापमान वाढत आहे; परंतु गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून, पावसाची शक्यता वाढली आहे. दरम्यान, गत चोवीस तासांत सोमवार सकाळी ८.३0 वाजेपर्यंत विदर्भातील किमान तापमान चंद्रपूर येथे २३.२ अंश सेल्सिअस नोंद करण्यात आले आहे. ब्रह्मपुरी येथे २१.३, नागपूर २0.२, वर्धा २२.५ किमान तापमान होते. तर, अकोला २0.८, अमरावती २0.४, बुलडाणा २0.0, वाशिम १९.0, गोंदिया २0.६ तर यवतमाळचे किमान तापमान २२.८ अंश सेल्सिअस होते. राज्यात नाशिकचे किमान तापमान सर्वात कमी म्हणजे १३.३ अंश सेल्सिअस होते. उर्वरित राज्यात मुंबई (कुलाबा) २0.0, सांताक्रुझ १६.४, रत्नागिरी १७.५, डाहणू १८.८, भिरा १४.५, पुणे १५.९, अहमदनगर १४.0,जळगाव १४.४, कोल्हापूर १८.५, सांगली १७.९, सातारा १७.१, सोलापूर २१.७, उस्मानाबाद १९.४, औरंगाबाद २0.४, परभणी २0.६, नांदेड येथे १८.0 तापमान होते. यावर्षी मान्सून बर्यापैकी असल्याचे भाकीत आतापासूनच विविध हवामानशास्त्र संस्था काढत असल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
By admin | Published: February 16, 2016 1:09 AM