अकोला : मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक शाळांच्या परिसरात पाणी साचले असून, इमारतींच्या छतालाही गळती लागली आहे. मनपा आणि जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये डेक्स-बेंचची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना ओल्या जागेतच बसावे लागत आहे. सुविधांअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक शाळांच्या परिसरात डबके साचले असून, विद्यार्थी यातूनच ये-जा करत आहेत. एवढेच नाही तर इमारतींच्या छतालादेखील गळती लागल्याचे दृश्य निदर्शनास आले आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांच्या छताला गळती लागल्याने अनेक शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये पाणी साचले आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अद्यापही पूर्णत: डेक्स-बेंच नसल्याने त्यांना पट्ट्यांवरच बसावे लागते; परंतु पावसामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी टाकण्यात आलेल्या पट्ट्यादेखील ओल्या झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्ग खोलीत न बसविता व्हरांड्यात पट्ट्या टाकून बसविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्येही असाच प्रकार होत आहे. प्रशासनातर्फे पुरविण्यात येणाऱ्या अपुऱ्या सुविधांमुळे विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय होत आहे.