लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यात गत तीन दिवसांच्या कालावधीत संततधार बरसलेल्या पावसाचा पिकांना तडाखा बसला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील अकोला, बाळापूर व मूर्तिजापूर या दोन तालुक्यात संततधार पाऊस व नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे १० हजार १९९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे.जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांच्या कालावधीत संततधार पाऊस बरसल्याने, नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये बुधवार, १९ आॅगस्ट रोजी तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर या तीन तालुक्यांमध्ये पाऊस व पुरामुळे नदी व नाल्याकाठच्या शेतामधील १0 हजार १९९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.तीन तालुक्यातील पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे.बाळापूर तालुक्यात पावसाने ६६२७ हेक्टरचे नुकसान झाले असून, २२ गावे यामध्ये कासारखेड, गाझीपूर , मोधापूर, सातरगाव , बाभूळखेड , मांडवा खु. , काळबाई , बटवाडी खु. , बटवाडी बु. , पारस ,जोगलखेड , शेळद मांडोली , कास्तखेड , गायगाव , वाडेगाव , देगाव , व्याळा , रिधोरा , निंबा आदी गावांचा समावेश असून, अद्याप दोन सर्कलमध्ये प्राथमिक सर्व्हे सुरू असल्याची माहिती महसूल विभागाने दिली.मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा, लांडापूर, निंबा, मोहखेड, धोत्रा, शेंद, किनी-फनी, धानोरा वैद्य, धानोरा पाटेकर, खरब ढोरे, गाजीपूर, गोरेगाव, समशेरपूर, दताळा, उमई या गावांना फटका बसला असून, सध्या शेतात पाणी असल्याने पाहणी करता येत नाही, त्यामुळे या तालुक्यातील बाधित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता तहसीलदारांनी व्यक्त केली आहे.
‘या’ पिकांचे झालेले नुकसान!संततधार पाऊस व नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे अकोला व मूर्तिजापूर तालुक्यात ३ हजार ५७२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. त्यानुसार दोन्ही तालुक्यात नदी-नाले काठच्या शेतामधील सोयाबीन, तूर ,उडीद , मूग इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे.
संततधार पाऊस व नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तहसीलदारांकडून प्राप्त झाला आहे. एक नुकसानाचा प्राथमिक अहवाल गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.-संजय खडसे, निवासी उप-जिल्हाधिकारी.