अकोला : दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने संपूर्णअकोला जिल्ह्यात बुधवारी रात्रभर जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृष पाऊस बरसल्यामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे. अकोला शहरात सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची वाताहत झाली. मोर्णा नदीला गत अनेक वर्षानंतर मोठा पूर आला असून, नदीकाठच्या भागांमधील वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.
बुधवारी सायंकाळपासूनच अकोला शहर व जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्री पावसाने जोर पकडला. पहाटेपर्यंत धो धो पाऊस बरसत होता. यामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. जुने शहरातील डाबकी रोड, बाळापूर नाका भागात नाल्याचे पाणी शिरल्याने अनेक नागरिकांना रात्रभर जागून काढावी लागली. मोठी उमरी परिसरातही सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले. अनेकांच्या घरात कमरेएवढे पाणी घुसले होते. खडकी, कौलखेड, सिंधी कँम्प परिसरात मोर्णा नदीच्या पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरले. पुरात अडकलेल्या सुमारे पन्नास लोकांना तातडीने बाहेर सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. खडकी परिसरातील श्रद्धा नगर, सूर्या हाईट, स्मशानभूमी या परिसरात मोर्णा नदीचे पाणी शिरले आहे.
पुलाचा भराव खचला
अकोला शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरील मोर्णा नदीवरच्या पुलाचा भराव पाण्यामुळे खचला. सुदैवाने यावेळी वाहतुक नसल्याने मोठी दुर्घटना टळली. दुपदरी असलेल्या या पुलाच्या उत्तरेकडील बाजूचा भरावा खचला. स्थानिक प्रशासनाने तातडीने पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी बंद केली.
सांगवी खुर्द गावाचा संपर्क तुटला
अकोला तालुक्यात माेर्णा नदीकाठी असलेल्या सांगवी खुर्द गावात पुराचे पाणी शिरल्याने गावाचा उर्वरित भागाशी संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात उमेश श्रीकृष्ण मोरे यांचा ट्रॅक्टर वाहून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.