अकोला: जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे मूर्तिजापूर व अकोट या दोन तालुक्यांत १३५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सोमवारी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.
जिल्ह्यात शनिवार व रविवारी रात्री दमदार पाऊस बरसला असून, पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला सोमवार, १२ जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार मूर्तिजापूर तालुक्यात १५ गावांतील २५ हेक्टर तर अकोट तालुक्यातील २२ गावांत ११० हेक्टर असे एकूण १३५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे जिल्ह्यातील पिकांसह घरांच्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.
नऊ घरांचे नुकसान !
गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात बरसलेल्या पावसामुळे आठ घरांचे नुकसान झाले. त्यामध्ये अकोट तालुक्यात एक व मूर्तिजापूर तालुक्यात सहा घरांचे अंशतः नुकसान झाले असून, बाळापूर तालुक्यात एक घर पूर्णतः कोसळून नुकसान झाले आहे. यासोबतच बाळापूर तालुक्यातील कासारखेड येथील सतरंजीपुरा भागात १० जुलै रोजी घर कोसळून ९ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. तसेच बटवाडी खुर्द येथे वीज कोसळून एक बैल ठार झाला.
गेल्या दोन दिवसांत पावसामुळे जिल्ह्यातील दोन तालुक्यात १३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसानासह घरांच्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सोमवारी सादर करण्यात आला आहे.
संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी