ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा) : मृग नक्षत्राच्या सुरूवातीला पश्चिम वर्हाडात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्यांनी लगबगीने खरीपाच्या पेरणीस प्रारंभ केला. पश्चिम विदर्भात जवळपास ६0 ते ६५ टक्के पेरण्या झाल्या असताना, एक आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पावसाची दांडी खरीप हंगामातील पिकांच्या मुळावर आली असल्याचे दिसून येत आहे. पश्चिम वर्हाडातील शेतकर्यांनी गतवर्षीच्या भीषण परिस्थितीतून सावरून कशी-बशी पेरणी केली. अनेक वर्षानंतर यंदा प्रथमच मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्यांनी लगबगीने मृग नक्षत्रात पेरणी केली. पश्चिम विदर्भातील पेरणीक्षेत्र १६ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. सोयाबीनचा पेरा सर्वाधिक ६ लाख हेक्टर क्षेत्रावर आहे. कापासचे क्षेत्र ४ लाख ८८ हजार १00 हेक्टरवर पोहोचले आहे; परंतू गत आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे पश्चिम विदर्भातील १६ लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरणी धोक्यात आली आहे. मूग, उडीद या पिकासाठी पोषक असलेल्या वातावरणाचा कालावधीही निघुन गेल्याने शेतकर्यांची मदार आता सोयाबीन आणि सुर्यफुल यासारख्या पिकांवर राहणार आहे.
कृषी दिनाच्या आनंदोत्सवावर विरजण
१. मृग नक्षत्रात खरिपाच्या पेरण्या आटोपून मोठय़ा उत्साहाने साजरा केला जाणार कृषीवलांचा आनंदोत्सव म्हणजेच कृषि दिन. यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकर्यांच्या कृषी दिनाच्या आनंदोत्सवावर विरजण पडले आहे.
२. गतवर्षीप्रमाणेच जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पेरणी करपण्याची चिन्हे दिसत आहेत.
३. काही दिवसांपासून दुपारच्या वेळेला उन्हाचा पारा वाढत असल्याने खरीप हंगामची पेरणी तग धरणे कठीण आहे.
४. खरीप हंगामाच्या पिकांना पावसाची नितांत गरज भासत असल्याने शेतकर्यांनी विहिर, बोअरिंगच्या पाण्यावर पिकं जगविण्यासाठी धडपड सुरू केली आहे.