अकोला: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, अकोला शहरात कोरोना चाचण्या वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अकोला महानगरपालिका अंतर्गत झोन अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ.नीलेश अपार आदी उपस्थित होते. शहरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या कमी करण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला. यावेळी मनपाचे झोन अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्य सचिवांनी घेतला आढावा!
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मंगळवारी ‘व्हिडिओ काॅन्फरन्सिंग’व्दारे राज्यातील विविध जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील उपाययोजनांच्या कामांचाही आढावा घेण्यात आला. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्यांवर भर देण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त निमा अरोरा उपस्थित होत्या.