संजय उमक
मूर्तिजापूर : तालुक्यातील राजनापूर खिनखिनी या गावात भारतीय जैन संघटना व ग्रामपंचायत राजनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजनापूर येथील दोन नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले, राजनापूर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळला. नाला खोलीकरण झाल्याने व नाल्यावर सिमेंट बंधारे असल्याने हे पावसाचे पाणी त्या बंधाऱ्यांमध्ये साचल्याल्याने भविष्यात शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे.
पालकमंत्री बच्चू कडू यांनी दत्तक घेतलेले गाव म्हणून राजनापूर खिनखिनीची ओळख आहे. या गावात अनेक विकासकामांना वेग आला असून, अलीकडेच गावातील दोन मोठ्या नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले आहे. नाला २० ते २२ फूट खोल असून, सध्या नाल्यात १० ते १५ फूट पाणी साचले आहे. गत आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने राजनापूर परिसरातल्या विहिरींची पातळी एक ते दोन फुटांनी वाढली असून, खरीप आणि रबी पिकांची चिंता या नाला खोलीकरणाने मिटल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय जैन संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिल्याने शेतकरी सुखावला आहे.
----------------------
पाणीटंचाई निवारण्यासाठी गाव सज्ज!
भारतीय जैन संघटनेच्या ‘सुजलाम् सुफलाम् अकोला’ या अभियानांतर्गत राजनापूर खिनखिनी परिसरातील शेत शिवार सुजलाम् सुफलाम् होणार आहे. यामुळे गावातील पाणी विहिरी व विंधन विहिरींची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली असून, भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी गाव सज्ज झाले आहे. राजनापूर परिसरात या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून, पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न तडीस निघाला आहे.
-----------------------
‘मशीन आमची, डिझेल तुमचे!’
पहिल्याच पावसात नाले तुडुंब भरले आहेत. भारतीय जैन संघटनेमार्फत गेल्या दीड महिन्यापासून नाला खोलीकरणाचे व शेतकऱ्यांच्या शेतातील नाले दुरुस्ती, बांध बांधण्याचे काम करण्यात आले. 'मशीन आमची डिझेल तुमचे' या तत्त्वावर हे काम करण्यात आले असून, शेतकऱ्यांना अवघ्या ५० टक्के रकमेमध्ये हे काम करता आले. शेतामध्ये पावसाळ्यात नाल्याचे पाणी शिरून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते या नाला खोलीकरणाने शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. ज्या शेतकऱ्याकडे शेती सिंचनाची व्यवस्था नव्हती त्या शेतकऱ्यांना हा नाला आता वरदान ठरला आहे. खरिपासोबतच रबी हंगामात शेतकऱ्यांना सिंचन करणे शक्य होणार आहे.
- - - - - - - - -
गाव पाणीदार होण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक प्रा. सुभाष गादिया व जिल्हा व्यवस्थापन नितींजी राजवैद्य व पालकमंत्री बच्चू कडू यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या या सहकार्याने शेतकऱ्यांना चांगलाच फायदा झाला आहे.
-प्रगती कडू, सरपंच, राजनापूर खिनखिनी