अकोला : सिकलसेल हा एक प्रकरचा हिमोग्लोबिनचा आजार असून, तो जनुकीय दोषांमुळे होतो. प्रत्येकाने सिकलसेल तपासणी करणे काळाची गरज आहे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले. जागतिक सिकलसेल दिनानिमित्त येथील जिल्हा स्त्री रुग्णालय येथे आयोजित करण्यात आलेल्या रॅलीप्रसंगी ते बोलत होते. सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी होण्याच्या दृष्टीने आयोजित या रॅलीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, बालरोग तज्ज्ञ डॉ. साधवानी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. आरती कुलवाल यांनी सिकलसेल आजाराबाबत सविस्तर माहिती देतानाच या आजाराचे नियंत्रण कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. तरंगतुषार वारे यांनी या आजाराची वेळेवर तपासणी न केल्यास कोणत्या अडचणी येतात, हे सांगून या आजाराची तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. यावेळी इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. या रॅलीत परिचारिका, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हा स्त्री रुग्णालय येथून सुरू झालेली ही रॅली जठारपेठ चौक, होलीक्रॉस स्कूल, रतनलाल प्लॉट चौक, विद्युत भवन, दुर्गा चौक, अशी मार्गक्रमण करीत परत जिल्हा स्त्री रुग्णालयात आली. या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला. संचालन प्रसिद्धी प्रमुख प्रकाश गवळी यांनी, तर आभार सचिन पाटेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा सिकलसेल समन्वयक किशोर फाळके, आशा समन्वयक सचिन उनवणे, सीमा बेंद्र, दीपाली खारोडे, सिकलसेल तंत्रज्ञ सरिता कुशवाह यांनी परिश्रम घेतले.
जागतिक सिकलसेल दिनानिमित्त रॅली
By admin | Published: June 20, 2017 1:22 PM