अकोला: मुकुंदनगर स्थित श्रीराम मंदिर येथे आयोजित मराठी व हिंदी भक्तिमय संगीत कार्यक्रमात परिसरातील नागरिक रामरंगी रंगले. गुढीपाडव्यानिमित्ताने राजेश्री देशपांडे व त्यांच्या चमूतर्फे शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या भक्तिमय संगीत कार्यक्रमात राजेश्री देशपांडे, अर्जुन देशपांडे, दीपा राजुरकर, प्रमोद राऊत आणि सपना राऊत यांनी आपल्या सुमधुर आवाजात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गजानना श्री गणराया... या भक्तिमय गीतांना राजेश्री देशपांडे यांनी संगीतमय कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर राजेश्री देशपांडे यांनी गायिलेल्या ‘रामनाम अति मीठा’ या भक्तिमय गीताने सर्वच रामनामाच्या गजरात रंगले होते. गायक अर्जुन देशपांडे यांनी पायोजी मैने रामलखन, प्रमोद राऊत यांनी जग मे सुंदर है दोन नाम, दीपा राजुरकर यांनी माय भवानी, सपना राऊत आणि प्रमोद राऊत यांनी श्याम तेरी बन्सी, दीपा राजुरकर यांनी यशोमती मैय्या से बोले नंदलाला, राजेश्री देशपांडे यांनी पांडुरंग नामी लागलासे ध्यास हे गीत गाईले. त्यांच्या या सुमधुर आवाजात परिसर भक्तिमय झाला होता. गायकांच्या सुरेल आवाजाला राजू जोशी (बासरी), प्रशांत इंगळे (तबला), गोपाल राऊत (हार्मोनिअम), तर आशीष आसोलकर (साउंड) या वाद्यवृंदांनी साथ दिली. कार्यक्रमाचे संचालन सुवर्णा गढे यांनी केले.