लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : शहरातील गोलबाजार परिसरात परवान्याच्या क्षमतेपेक्षा मोठय़ा प्रमाणावर फटाक्यांची साठवणूक करून, नागरिकांच्या जीवित्वास धोका निर्माण करणार्या रमण श्रावगीसह चौघांविरुद्ध अकोट शहर पो.स्टे.ला १५ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने १४ ऑक्टोबरच्या रात्री श्रावगी याच्या घरातील गोडावूनवर धाड घातली होती. रात्रभर सुरू असलेल्या कारवाईत ३३ लाखांचे फटाके पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलीस सूत्रानुसार, गोलबाजार परिसरात नागरी वस्तीमध्ये गोदाम व घरात परवान्याच्या क्षमतेपेक्षा मोठय़ा प्रमाणावर फटाक्यांची साठवणूक केल्याची माहिती विशेष पथकाचे हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यावरून १४ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३0 वाजता सुमारास पाळत ठेवून रमण सीताराम श्रावगी याचे गोदाम व घरावर छापा घातला. त्यावेळी मोठय़ा प्रमाणात फटाक्यांचा साठा मिळून आला. १५ ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू हो ती. या प्रकरणी आरोपी रमण सीताराम श्रावगी, सरिता रमण श्रावगी, दिलीप चुन्नीलाल राठोड, सुहास प्रल्हाद वाघ यांच्याविरुद्ध मानवी जीवित्वास धोका निर्माण होईल, अशाप्रकारे परवान्यापेक्षा जास्त फटाक्यांची साठवणूक केल्याच्या कारणावरून भादंविच्या २८६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्या त आला. सदर गोदाम व घरामधून एकूण ३३ लाख ९१ हजार ६00 रुपये किमतीचे फटाके जप्त करण्यात आले असून, चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आरोपी असलेला रमण श्रावगी याचे विरुद्ध प्रतिबंधित चायनीज मांजा विक्रीप्रकरणीसुद्धा दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फटाके परवान्याची चौकशी होणार! दिवाळीच्या उत्सवादरम्यान फटाके विक्रीची दुकाने मोठय़ा प्रमाणात थाटल्या जातात. त्याकरिता आवश्यक असलेला परवाना काढण्यात येतो, परंतु परवानाधारक दुकान न लावता आपला परवाना भाड्याने देत असल्याची माहिती पोलीस व महसूल विभागाला प्राप्त झाली आहे. परवानाधारकाने स्वत: दुकानावर बसून दुकानाची सुरक्षितता ठेवणे गरजेचे आहे. शिवाय फटाके या स्फोटक पदार्थ साठवणुकीकरिता गोदामाच्या परवानगीकरिता ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. तसेच नागरी वस्तीत फटाक्याचे गोदाम असणे नागरिकांच्या जीवित्वास धोका निर्माण करणारे असल्याने पोलीस व महसूल प्रशासनाने फटाक्याचा प्रश्न गंभीरतेने घेतला आहे.