अकोला शहरात फिरते पथक सक्रिय
अकोला : कोरोना चाचणी फिरते पथक सक्रिय असून, पूर्व झोनमधील ५४ नागरिकांची चाचणी करण्यात आली. १३ एप्रिल रोजी मनपा क्षेत्रातील पूर्व झोनमध्ये १००, पश्चिम झोनमध्ये २५, उत्तर झोनमधील ३५ आणि दक्षिण झोनमधील ६३ अशा एकूण २२३ नागरिकांची चाचणी करण्यात आली.
बौद्ध महासभेतर्फे मेघा वर हिचा सत्कार
अकोला : येथील साहित्यिक पंजाबराव वर यांची कन्या मेघा वर हिची अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्थान नागपूर येथे नर्सिंग ऑफिसरपदी नियुक्ती झाल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने घरी जाऊन तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी.जे. वानखडे, प्रा. डॉ. एम.आर. इंगळे, भाऊसाहेब थोरात, रामेश्वर गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मेघा वर हिच्या यशाबद्दल कौतुक केले.
अखंड हिंदू धर्म एकत्रीकरण विचार मंचातर्फे ध्वजारोहण
अकोला : गुढीपाडवानिमित्ताने मंगळवारी अखंड हिंदू धर्म एकत्रीकरण विचार मंचाच्यावतीने गांधी चौक येथे पहाटे शंखनाद करून भगवा धर्म ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला अखंड हिंदू धर्म एकत्रीकरण विचार मंचाचे उमेश लख्खन, आकाश सावते, आनंद नकवाल, रवी देशमाने, विनोद झाझोटे उपस्थित होते.