- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: गदिमा व बाबूजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संस्कार भारतीच्यावतीने विदर्भामध्ये १५१ ठिकाणी गीत रामायण कार्यक्रम होणार आहेत. या उपक्रमाला ‘विदर्भ प्रांत गीत रामायण’ असे नाव दिले आहे. कलेच्या माध्यमातून राम चरित्र, त्यातील आदर्श मूल्य सर्वदूर पोहचविणे, असा संस्कार भारतीचा या उपक्रमामागील हेतू आहे. या उपक्रमातून गीत रामायण म्हणणारी किमान एक हजार नवीन गायक, वादक, नर्तक, निवेदक यांची नव्या दमाची चमू विदर्भात तयार होईल.कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक तथा अभिनेता, अशा अनेक कलाप्रांतात एकाच वेळी लिलया संचार करणाऱ्या गजानन दिंगबर माडगूळकर (गदिमा) आणि सुधीर फडके (बाबूजी) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्कार भारतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. फडके-माडगूळकर जोडीचं गीत रामायण किती लोकप्रिय झाले, हे मराठी भाषिकांना नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र, गदिमा आणि बाबूजी यांची जगावेगळी प्रतिभा आणि त्यांचा कलाविष्कार नव्या पिढीला कळावा, यासाठी संस्कार भारती हा शिवधनुष्य पेलणार आहे. यासंदर्भात पहिली बैठक अमरावती येथे झाली.गीत रामायण महायज्ञ विदर्भातील प्रत्येक तालुकास्थानी होणार आहे. संगीत, नृत्य आणि साहित्य या तीन कलेचा प्रामुख्याने कार्यक्रमात समावेश असणार आहे. अन्य कलांचा कार्यक्रमात स्थानिक सोय व उपलब्धतेप्रमाणे सहभाग राहणार आहे. संपूर्ण उपक्रमाचे संयोजन, आखणी अंमलबजावणीकरिता संगीत, नृत्य या कलेतील गुरू व प्रमुख कार्यकर्ते यांची एक समन्वय समिती निश्चित करण्यात आली आहे. या समितीची नियोजन बैठक २० सप्टेंबर रोजी होणार आहे. यामध्ये गीते, नृत्य, कार्यक्रमांची स्थाने, स्वरू प, प्रशिक्षण कार्यशाळा, प्रशिक्षक चमूंची निश्चिती होणार आहे. बैठकीपूर्वी सर्व समितीच्या मंत्री व संगीत प्रमुखांनी आपल्या स्थानाच्या गीत रामायण उपक्रमातील संभाव्य गायक, वादक, नृत्य गुरू व निवेदक यांची सूची सहा विभागप्रमुखांकडे नोंदविल्या जाणार आहे. आवश्यकता भासल्यास कलावंतांची आॅडिशन घेतल्या जाणार आहे.अकोला, यवतमाळ, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या सहा विभागातील निवड झालेल्या कलावंतांची दोन दिवसीय पहिली प्रशिक्षण कार्यशाळा २१ व २२ आॅक्टोबर आणि २७ व २८ आॅक्टोबर यापैकी एका शनिवार, रविवारी प्रत्येक विभागस्थानी घेण्यात येईल.‘विदर्भ प्रांत गीत रामायण महायज्ञ’ या उपक्रमामुळे वैदर्भीय कलावतांना निश्चितच प्लॅटफार्म मिळणार आहे.- सुधाकर अंबुसकर, विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष, संस्कारभारती