नागरिकांच्या घराेघरी जाऊन तसेच बाजारपेठेतून दैनंदिन कचरा संकलनासाठी मनपाने १२५ वाहनांची खरेदी केली. त्यावर कंत्राटी तत्त्वावरील चालकांची ‘स्वच्छतादूत’म्हणून नियुक्ती केली. कचरा संकलित करण्याच्या माेबदल्यात मालमत्ताधारकांकडून प्रत्येकी ३० रुपये महिना व दुकाने, वाणिज्य संकुलांमधून प्रत्येकी २०० रुपये महिना शुल्क वसूल केले जाते. या वाहनांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्वच्छता व आराेग्य विभागाकडे साेपविण्यात आली आहे. या विभागाच्या वतीने नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर दाेन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते दैनंदिन घंटागाड्यांची नाेंद ठेवतात. एका घंटागाडी चालकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत किमान दाेन फेऱ्या करणे अपेक्षित आहे. बाेटावर माेजता येणारे काही प्रामाणिक स्वच्छतादूत वगळल्यास इतर घंटागाडीचालक शहरालगत जवळच्या खुल्या मैदानावर कचरा फेकून पसार हाेत असल्याचे समाेर आले आहे. घंटागाडीचालकांवर वाॅच ठेवण्यासाठी मनपाची यंत्रणा सक्षम नसल्यामुळे इंधनाची उधळपट्टी सुरू आहे.
जमा केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया नाही !
शहरातून निघणाऱ्या घनकचऱ्यावर डम्पिंग ग्राउंड येथे विलगीकरण करणे गरजेचे आहे. घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न करताच ताे डम्पिंग ग्राउंडवर फेकला जात आहे. त्याठिकाणी कचऱ्यावर काेणतीही प्रक्रिया हाेत. नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, जलस्त्राेत दूषित झाले आहेत.
जीपीएस यंत्रणेला बगल
घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी १२५ घंटागाड्यांसह ३३ ट्रॅक्टरची व्यवस्था उपलब्ध आहे. तरीही मुख्य रस्ते, बाजारपेठ, गल्लीबाेळात कचऱ्याचे ढीग आढळून येतात. अशा वाहनांवर वाॅच ठेवण्यासाठी जीपीएसप्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक बाळ टाले यांनी मंजूर केला हाेता. याप्रणालीला प्रशासनाने जाणीवपूर्वक बगल दिली आहे.
घंटागाडीचालकांवर लक्ष ठेवून त्यांच्या दैनंदिन नाेंदी घेण्यासाठी डम्पिंग ग्राउंड येथे कर्मचारी नियुक्त केले आहेत. खुल्या जागेवर कचरा फेकणाऱ्या घंटागाड्यांचा वाहन क्रमांक दिल्यास वाहनचालकावर कारवाई केली जाईल.
- प्रशांत राजूरकर, विभागप्रमुख स्वच्छता व आराेग्य विभाग, मनपा
११७ टन
शहरात दरराेज निघणारा कचरा
१२५
कचरा संकलनासाठी लागणाऱ्या गाड्या