अकोला: रामदासपेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुधाकर देशमुख यांची ठाण्यातून पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात बदली केली. अचानकपणे त्यांची बदली केल्याने पोलीस कर्मचार्यांमध्ये चर्चा रंगली होती. रॉकेल प्रकरणाची तंटामुक्ती देशमुख यांना भोवल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. वर्षभरापूर्वीच पदोन्नतीवर सुधाकर देशमुख यांची मुंबई येथून अकोल्यात बदली करण्यात आली. त्यांच्याकडे रामदासपेठ पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु शनिवारी रात्री त्यांना, त्यांची प्रशासकीय कारण देत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये अचानक बदली केली. परंतु, बदलीमागील कारण स्पष्ट केले नाही. काही दिवसांपूर्वी रामदासपेठ पोलिसांनी ऑटोरिक्षामध्ये जाणारा दीडशे लीटर अवैध रॉकेल साठा जप्त केला होता. रॉकेलच्या साठय़ासह ऑटोरिक्षासुद्धा पोलीस ठाण्यात आणला होता. परंतु, या प्रकरणामध्ये रामदासपेठ पोलिसांनी तंटामुक्ती करून हा ऑटोरिक्षा व रॉकेलचा अवैध साठा सोडून दिला होता. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेत, शनिवारी अचानकपणे अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी ठाणेदार सुधाकर देशमुख यांची बदली नियंत्रण कक्षात केली. त्यांच्या जागेवर हिवरखेडचे ठाणेदार सोनोने यांना नियुक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रामदासपेठच्या ठाणेदाराची नियंत्रण कक्षात बदली
By admin | Published: June 01, 2015 2:35 AM