लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गावाच्या चारही बाजूंनी वाहणाऱ्या तीन नाल्यांना आलेल्या पुराने सोमवारी अकोला तालुक्यातील रामगावला पुराने वेढा घातला. त्यामुळे या गावाचा संपर्क तुटला आहे. गावातील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून, पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.संततधार पाऊस सुरू असल्याने, अकोला तालुक्यातील रामगाव या गावाच्या चारही बाजूंनी वाहणाºया लेंडी नाला, कोल्हा नाला व कोल्ही नाला या तीन नाल्यांना १७ आॅगस्ट रोजी पूर आला.गावाच्या चारही बाजूंनी पूर आल्याने रामगाव पुराच्या विळख्यात सापडले. गावाला पुराने वेढा दिल्याने गावात जाण्या-येण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. गावातील २० घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून, नाल्याकाठच्या परिसरातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, अशी माहिती रामगाव येथील शिवाजीराव भरणे यांनी दिली.
कौलखेड जहागीर येथे पूर; २५ घरांत शिरले पाणी!संततधार पाऊस सुरू असल्याने अकोला तालुक्यातील कौलखेड जहागीर येथे बहादरपूर नाला व कौलखेड नाला या दोन नाल्यांना सोमवारी पूर आला. गावातील २५ घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्यामुळे घरांमधील धान्य व इतर वस्तूंचे नुकसान झाले. तसेच नाल्याकाठच्या परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अशी माहिती कौलखेड जहागीर येथील सरपंच संगीता प्रदीप तायडे यांनी दिली.