तूर खरेदीला गती; शेतकरी ताटकळत!अकोला : हमीदराने शासनामार्फत तूर खरेदीत जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर तूर खरेदीला गती आली असली, तरी तुरीच्या मोजमापासाठी ‘टोकन’ मिळविण्याकरिता तूर उत्पादक शेतकऱ्यांना उन्हातान्हात ताटकळत बसावे लागत आहे. दिवसभर रांगेत उभे राहूनही टोकन मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत.हमीदराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी गत २२ एप्रिल रोजी सायंकाळपासून बंद करण्यात आल्याने, जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या पाच खरेदी केंद्रांवर गत दीड महिन्यापासून मोजमापाच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या १ हजार ९६३ ट्रॅक्टरमधील १ लाख ७ हजार ९७ क्विंटल तुरीचे मोजमाप रखडले होते. दरम्यान, तूर खरेदी केंद्रांवरील मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या तुरीचे पंचनामे करून तूर खरेदीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला. यासंबंधीचा शासन आदेश २६ एप्रिल रोजी प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर मोजमाप बाकी असलेल्या तुरीचे पंचनामे करून तूर खरेदी तातडीने सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व तालुका उपनिबंधकांना दिला होता. त्यानुसार जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवरील तुरीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, २८ एप्रिलपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली. पंचनामे करण्यात आलेल्या तुरीचे मोजमाप करून शेतकऱ्यांची तूर तातडीने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांवर तुरीचे मोजमाप २४ तास सुरू ठेवण्याचा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी १ मे रोजी दिला. त्यानुषंगाने जिल्ह्यात खरेदी केंद्रांवर पंचनामे करण्यात आलेल्या तूर खरेदीच्या प्रक्रियेला गती आली आहे; मात्र तुरीच्या मोजमापासाठी शेतकऱ्यांना ‘टोकन’ देण्याच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याने ‘टोकन’ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागत आहे. खरेदी केंद्रांवर उन्हातान्हात आणि प्रचंड उकाडा सहन करीत दिवसभर रांगेत उभे राहूनही ‘टोकन’ मिळत नसल्याने तुरीच्या मोजमापापूर्वी ‘टोकन’ मिळविण्याकरिता तूर उत्पादक शेतकऱ्यांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत असल्याचे वास्तव अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती तूर खरेदी केंद्रावर बुधवारी आढळून आले.सहा दिवसांत ६३८३ क्विंटल तूर खरेदी!अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या खरेदी केंद्रावर अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांतील तूर खरेदी करण्यात येत आहे. २८ एप्रिल ते ३ मे या सहा दिवसांच्या कालावधीत या खरेदी केंद्रावर ३७३ शेतकऱ्यांची ६ हजार ३८३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आल्याची माहिती तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी दिली.असे दिले जाते ‘टोकन’!तूर खरेदी केंद्रांवर तुरीचे मोजमाप करण्यापूर्वी पंचनामे झालेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना टोकन दिले जाते. टोकन दिल्यानंतर संबंधित तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप करून तूर खरेदी केली जाते.मोजमापासाठी काटे वाढविले; टोकन देण्याचे काम एकाच टेबलवर!शासनामार्फत तूर खरेदीत खरेदी केंद्रांवर पंचनामे झालेल्या तुरीचे तातडीने मोजमाप करण्यासाठी वजन काटे वाढविण्यात आले. त्यामध्ये अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या खरेदी केंद्रांवर १३ काटे लावण्यात आले. तुरीच्या मोजमापासाठी काटे वाढविण्यात आले असले, तरी मोजमापापूर्वी तूर उत्पादक शेतकऱ्यांना टोकन (पावती) देण्याचे काम मात्र एकाच टेबलवर सुरू आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना टोकन देण्यास विलंब होत असल्याचे आढळून आले.तुरीचे पंचनामे करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना तुरीच्या मोजमापासाठी टोकन मिळविण्यासाठी उन्हातान्हात उभे राहावे लागत आहे. दिवसभर उभे राहूनही टोकन मिळत नसल्याने, नंबरप्रमाणे टोकन मिळाले पाहिजे आणि तुरीचे मोजमाप तातडीने झाले पाहिजे.-प्रकाश भोजने, तूर उत्पादक शेतकरी, नया अंदुरा.तुरीच्या मोजमापासाठी टोकन घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. दिवसभर रांगेत ताटकळत उभे राहूनही टोकन मिळत नाही. त्यामुळे टोकन मिळण्यासाठी चकरा माराव्या लागत आहेत.-सुनील चोपडे, तूर उत्पादक शेतकरी, वाडेगाव.टोकन मिळण्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत रांगेत उभे राहावे लागत आहे. टोकनसाठी होणारा त्रास कमी करून तुरीचे मोजमाप तातडीने झाले पाहिजे.-रामेश्वर दांदळे, तूर उत्पादक शेतकरी, खिरपुरी.तुरीच्या मोजमापासाठी टोकन मिळविण्याकरिता उन्हातान्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. टोकन देण्याचे काम एकाच टेबलवर असल्याने टोकन मिळण्यास विलंब होत आहे. - मोहन फाळके, तूर उत्पादक शेतकरी, वाडेगाव.दिवसभर रांगेत उभे राहूनही टोकन मिळत नाही, त्यामुळे तुरीच्या मोजमापासाठी टोकन मिळण्याकरिता चकरा माराव्या लागत आहेत.-पी.एस. शेगावकर, तूर उत्पादक शेतकरी, गोरेगाव बु.
‘टोकन’साठी रांगा!
By admin | Published: May 04, 2017 1:04 AM