अकोला : आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर असलेल्या मलेरिया विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकावणे तसेच १० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या बोगस पत्रकाराविरुद्ध रामदास पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशफाक पटेल असे या बोगस पत्रकाराचे नाव आहे.मलेरिया विभागाचे अधिकारी डॉ. राठोड हे ३ एप्रिल रोजी कामात व्यस्त असताना बोगस पत्रकार अशफाक पटेल त्यांच्या कार्यालयात आला. त्याने कार्यालयातील माहिती विचारून डॉ. राठोड यांची बदनामी करण्याची धमकी दिली. बदनामी टाळायची असेल, तर आताच १० हजार रुपये देण्याची मागणी केली. मात्र, राठोड यांनी सदर बोगस पत्रकाराची माहिती घेतली असता तो पत्रकार नसल्याचे समोर आले. या प्रकरणाची तक्रार डॉ. राठोड यांनी रामदास पेठ पोलीस स्टेशनमध्ये केल्यानंतर पोलिसांनी बोगस पत्रकार अशफाक पटेल याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अशफाक पटेल याच्याविरुद्ध यापूर्वीही खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.बोगस पत्रकारांचा सुळसुळाट!शहरासह जिल्ह्यात सध्या बोगस पत्रकारांचा प्रचंड सुळसुळाट आहे. व्हॉट्स अॅपवर ग्रुप तयार करून त्यामध्ये पोलीस अधिकारी आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना समाविष्ट करणे व या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव आणणे व यामधूनच पैशाची मागणी करणारे पत्रकार प्रचंड निर्माण झाले आहेत. काही पत्रकार पोलीस कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकारी असलेल्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर त्यांची बदनामी होईल, अशाप्रकारचे मॅसेज टाकतात आणि त्यानंतर सदर कर्मचाऱ्यांना पैशाची मागणी करीत असल्याचेही पोलीस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
बोगस पत्रकाराविरुद्ध खंडणीचा गुन्हा!
By admin | Published: April 13, 2017 2:04 AM