अकोला: पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पतीला जिल्हा व सत्र प्रथम न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांनी पाच वर्षाचा सश्रम कारावास आणि ३0 हजार दंड, दिराला तीन वर्षाचा सश्रम कारावास आणि २0 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. मृतक विवाहितेचे वडील निरंजन नामदेव खंडेराव यांनी २९ ऑगस्ट २00८ रोजी जुने शहर पोलीस ठाण्या त दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी करुणा हिचा पती संजय रामलाल उमाळे, दीर अजय उमाळे, सासरा रामलाल, सासू सुशीला उमाळे यांनी संगनमत करून करुणा हिला विष पाजून तिची हत्या केली. तक्रारीनुसार पोलिसांनी भादंवि ३0२, ४९८(३४) गुन्हा दाखल केला आणि आरोपींना अटक केली. पुढे आरोपींना जामिनावर सोडण्यात आले. प्रकरणाचा तपास जुने शहर पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सुरेंद्र ठाकूर, ठाणेदार के.बी. सिरसाट यांनी केला. पुढे पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३0६ नुसार गुन्हा दाखल केला आणि दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी प्रथम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षाने दहा साक्षीदार तपासले. यात दोन साक्षीदार फितुर झाले. आरोपी संजय उमाळे व दीर अजय उमाळे यांच्या विरुद्ध सबळ पुरावे मिळून आल्याने न्यायालयाने त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सासू व सासरा यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. संजय उमाळेला ३0६ मध्ये पाच वर्ष सश्रम कारावास, ३0 हजार रुपये दंड, न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. आरोपींनी दंडाची रक्कम मुलीच्या वडिलांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
पत्नीला आत्महत्येस बाध्य करणा-या पती व दिराला सश्रम कारावास
By admin | Published: May 03, 2016 2:13 AM