अकोला : ज्या ज्या भागात जादा रुग्णसंख्या आढळून येत असेल अशा ठिकाणी रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे शिबिर आयोजित करण्यात यावे, तसेच कोविड रुग्णांची संख्या अलिकडे वाढतांना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्व यंत्रणांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना, मास्कचा वापर, हात धुणे व सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.
या संदर्भात मंगळवारी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, डॉ. श्यामसुंदर शिरसाम, डॉ. अंभोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच अन्य संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोविड रुग्ण संख्या वाढत असून त्यामागील कारणमीमांसा जिल्हा शल्यचिकित्सक यांनी उपस्थितांना सांगितली. एखाद्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु करण्यासोबतच त्याच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच गृह अलगीकरणात (होम आयसोलेशन) ठेवलेल्या रुग्णांच्या उपचारांवर नियमित लक्ष ठेवणे आदी उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्या, असे त्यांनी सांगितले.
अशा आहेत सूचना
ज्या भागात रुग्णसंख्या अधिक आढळून येत असेल अशा ठिकाणी रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे शिबिर.
बाजारात दुकानदारांनी आपल्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक हा मास्क वापरतो आहे याची खातरजमा करावी.
रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाईक तसेच तापाने आजारी रुग्णांची आरटीपीसीआर तपासणी करावी.
पॉझिटिव्ह रुग्णांना गृह अलगीकरणाची परवानगी देतांना रुग्णांच्या घरी रुग्णासाठी स्वतंत्र खोली असल्याची खातरजमा करावी.
गृह अलगीकरणातील रुग्णांची तपासणी ही आरोग्य सेवकांमार्फत नियमित १४ दिवसांपर्यंत करावी.
खाजगी रुग्णालयांवर जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत नियंत्रण ठेवावे
उपचार, मृत्यूदर याबाबत ऑडिट करावे.