अकोला : राष्ट्रसंतांनी सर्वधर्म समभावतेचा विचार देत राष्ट्रधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचे प्रतिपादन रामदास चोरोडे गुरुजी यांनी केले. देशातील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना त्यांनी राष्ट्रसंतांच्या विचारांची आज समाजाला आवश्यकता असून, तरुणाईमध्ये हे विचार रुजविणे महत्त्वाचे आहे, असेही यावेळी त्यांनी म्हटले.संत तुकाराम चौक , रिंगरोड परिसरातील बिसेननगर मैदान येथे निसर्गवासी विश्वनाथ चिंचोळकर सभागृहात शनिवारी सातव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे थाटात उद््घाटन पार पडले. यावेळी संमेलनाध्यक्षीय भाषण देताना ते बोलत होते. संमेलनाच्या उद््घाटकीय कार्यक्रमाला विचार मंचावर उद््घाटक म्हणून प्रा. डॉ. ममता इंगोले, प्रा. ललीत काळपांडे, ज्ञानेश्वर रक्षक, प्रा. डॉ. गजानन नारे, कृष्णा अंधारे, राष्ट्रसंतांच्या भूमिकेत यावली येथील मिरजकर, कृष्णा अंधारे, ज्ञानेश्वर केसाडे महाराज, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, मनोजसिंग बिसेन, आयोजन समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती. आपल्या अध्यक्षीय भाषणात पुढे बोलताना चोरोडे गुरुजी म्हणाले की, समाज अन् संत हे असे समीकरण आहे, जे एकमेकांपासून वेगळे करता येणार नाही. समाजात द्वेशभाव, अंहकाराचा प्रभाव वाढत जातो, तेव्हा समाज विस्कळीत होतो. या अधोगतीला चाललेल्या समाजाला योग्य दिशा दाखवितात तेच खरे संत ठरतात.
राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन : राष्ट्रधर्मच सर्वश्रेष्ठ आहे - रामदास चोरोडे गुरुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 6:13 PM