संतोष येलकर.
.अकोला : नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा अंतिम होईपर्यंत शहरी भागात नवीन स्वस्त धान्य परवाना मंजुरीला देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत असल्याचा आदेश १६ सप्टेंबर रोजी शासनाच्या पुरवठा विभागामार्फत देण्यात आला आहे. या नवीन आदेशाने जिल्ह्यात नवीन १८ रेशन दुकाने वाढणार असून, नवीन स्वस्त धान्य दुकानांचे परवाने मंजूर करण्याची कार्यवाही लवकरच जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात येणार आहे.
नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा अंतिम होईपर्यंत राज्यातील शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकानांचा परवाना मंजूर करण्यास शासनाच्या १३ डिसेंबर २०१८ रोजीच्या आदेशानुसार स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती १६ सप्टेंबर २०२१ रोजीच्या शासन आदेशानुसार उठविण्यात आली असल्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रेशन धान्य दुकानांची संख्या आता वाढणार आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात नवीन १८ रेशन धान्य दुकानांची संख्या वाढणार असून, नवीन रेशन धान्य दुकानांचे परवाने मंजुरीची कार्यवाही जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
.........................................
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची संख्या
१०६१
शहरी
२१८
ग्रामीण
८४३
.............................................
कोठे किती वाढणार दुकाने?
अकोला शहर .... ६
अकोला ग्रामीण ... ४
बार्शिटाकळी ... ६
अकोट ... १
तेल्हारा ... १
.............................................
काय आहेत अडचणी?
रेशन धान्य दुकान मंजूर नसलेल्या संबंधित भागातील रेशन कार्डधारक लाभार्थींना स्वस्त धान्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो.
‘रेशन’साठी लाभार्थींना घरापासून बरेच दूर असलेल्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाण्या-येण्याचा त्रास सहन करावा लागतो.
नवीन रेशन धान्य दुकान मंजूर झाल्यास रेशन कार्डधारक लाभार्थींची धान्यासाठी होणारी गैरसोय दूर होणार आहे. तसेच अडचणीही कमी होणार आहेत.
........................................................
शासनाच्या आदेशानुसार शहरी भागात नवीन स्वस्त धान्य मंजूर करण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात नवीन १८ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने मंजूर करण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
बी.यू.काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.