अकोला: गस्तीवर असलेल्या खदान पोलिसांनी २0 डिसेंबर रोजी २४ क्विंटल ५१० किलो तांदूळ घेऊन जाणारा ट्रक अडविला आणि तांदूळ खरेदी-विक्रीची कागदपत्रे मागितली होती; परंतु कागदपत्रे नसल्यामुळे पोलिसांनी ट्रक व तांदूळ जप्त करून ट्रक चालक अब्दुल रहीम अब्दुल रहेमान यास अटक केली होती. आता या प्रकरणात ठाणेदार उत्तम जाधव यांनी स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ काळ्याबाजारात विकणारा सस्ती येथील रेशन माफिया शेख उस्मान शेख दिलावर याला मंगळवारी अटक केली.अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत रेशनचे धान्य नागरिकांना उपलब्ध करून जाते. आॅनलाइन पद्धतीने कार्डधारकांना धान्याचे वितरण होते; परंतु कार्डधारकांच्या वाट्याचे धान्य काही रेशन माफिया काळ्याबाजारात विकत असल्याचे खदान पोलिसांनी २0 डिसेंबर रोजी केलेल्या कारवाईवरून दिसून येते. खदान पोलीस गस्त घालत असताना खडकी परिसरात एमएच-२८ बीबी-०२६१ क्रमांकाचा ट्रक पोलिसांनी अडविला. त्या ट्रकची तपासणी केल्यानंतर रेशनचा तांदूळ काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी सहा लाख रुपयांचा तांदूळ व ट्रक जप्त करून चालक अब्दुल रहीम अब्दुल रेहमान (२६, रा. दिवाणपुरा, मंगरूळपीर) याला अटक केली. त्याची चौकशी केल्यावर त्याने हा तांदूळ वाडेगाव सस्ती येथील रेशन माफिया शेख उस्मान शेख याचा असल्याची माहिती दिली. पोलिसांनी शेख उस्मान शेख दिलावर याला मंगळवारी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)
सस्ती येथील रेशन माफियाला अटक; गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 11:43 AM