अकोला : सणासुदीच्या दिवसांत मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणी वाढली की दरही वाढतात, असा पायंडा असला, तरी या वर्षी गणेशोत्सवात मिठाईचे दर स्थिरच आहेत. तथापी, मिठाईसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर वाढल्याने आगामी काही दिवसांत मिठाईचे दर वाढण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. मिठाईसाठी लागणारे दूध, साखर, सुका मेवा, केसर आदी साहित्यांचे दर गत दोन महिन्यांपासून वाढले आहेत. याचा फटका स्वीटमार्ट व्यावसायिकांना बसत आहे, परंतु गणेशोत्सव व महालक्ष्मी सणातही मिठाईची भाववाढ करण्यात आली नाही. आगामी काही दिवसांत कच्च्या मालाचे दर चढेच राहिले, तर नाइलाजास्तव मिठाईचे दरही वाढवावे लागतील, असे स्वीट मार्ट व्यावसायिक असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
असे आहेत मिठाईचे दर (किलोमध्ये)
मिठाई सद्याचा दर गणेशोत्सवाआधीचा दर
मलाई पेढा ४०० ४००
केशर पेढा ४४० ४४०
मोतीचूर लाडू ४४० ४४०
काजूकतली ८०० ८००
ड्रायफ्रुट बर्फी १००० १०००
...म्हणून वाढू शकतात दर
मिठाईचा अविभाज्य घटक असलेल्या दुधाचे दर दोन रुपयांनी वाढले आहेत. सुकामेव्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या सर्व कारणांमुळे मिठाई तयार करण्याचा खर्च वाढला आहे.
- स्वीटमार्ट चालक
मिठाई हा नाशवंत पदार्थ असल्यामुळे त्याची लवकर विक्री होणे गरजेचे असते. सद्या सर्वच कच्च्या मालाचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे नाइलाजास्तव दर वाढू शकतात.
- स्वीटमार्ट चालक
भेसळीकडे लक्ष असू द्या
सणासुदीच्या दिवसांत मिठाईमध्ये भेसळखोरीचे प्रमाण वाढते. खव्यामध्ये मैदा किंवा तत्सम पदार्थ मिसळून तयार केली मिठाई ग्राहकांच्या माथी मारल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरावर नियंत्रण कोणाचे?
मिठाई किंवा खाद्यपदार्थांमध्ये भेसळ रोखण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे असली, तरी दरावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार या विभागाकडे नाहीत. त्यामुळे दर वाढत असतील, तर त्यावर नियंत्रण कोण ठेवणार, हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
साखर व दुधाचे भाव वाढलेले नसतानाही आमच्या भागात मिठाईचे भाव मात्र वाढलेले आहेत. सणासुदीच्या दिवसांत मिठाई खरेदी हा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे महाग असली, तरी मिठाई खरेदी केलीच जाते.
- प्रशांत केदार, एक ग्राहक
मिठाई व इतर गोडधोड पदार्थांशिवाय सण साजरा केल्यासारखे वाटत नाही. गणपती, गौरी या मोठ्या उत्सवांमध्ये मिठाई खरेदी करावीच लागते. मिठाईचे दर मात्र नियंत्रणात असावे.
- निरंजन मूर्तिजापूरकर, एक ग्राहक