अकोला : पीक नुकसानाची पाहणी करण्यासाठी शनिवारी जिल्ह्याच्या दौºयावर आलेले शिवसेना नेते दिवाकर रावतेंना दहीगाव गावंडे परिसरातील शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर जाण्यास विरोध केला. तुम्ही सरकारमध्ये असताना शेतकºयांसाठी काय केले, असा जाब विचारत शेतकºयांनी रावतेंना घेराव घातला. यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार नितीन देशमुख व विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी शेतकºयांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; परंतु शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे पाहून रावते यांनी तेथून काढता पाय घेतला.राज्यात सर्वत्रच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी राजकीय नेत्यांचे सध्या सर्वत्र दौरे सुरू आहेत. अकोला जिल्ह्यालाही सर्वाधिक झळ पोहोचली असून, शेतकºयांच्या तोंडी आलेला घास हिरावला आहे. जवळपास साडेतीन लाख हेक्टरवर पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे नेते तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते जिल्हा दौºयावर आले आहेत. आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. नितीन देशमुख यांच्यासह रावते दहीगाव गावंडे येथे पोहोचले होते. येथे शेतकरी व शेतकरी जागर मंचच्या कार्यकर्त्यांना रोषाला सामोरे जावे लागले. शेतकºयांनी रावते यांना घेराव घातला. शेतकºयांना तातडीने एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्या, शेतकºयांचा सातबारा कोरा करा, एकच नारा, सातबारा करा कोरा, अशा घोषणा देण्यास शेतकरी जागर मंचचे कृष्णा अंधारे, मनोज तायडे, जगदीश मुरू मकार, ज्ञानेश्वर गावंडेंसह शेतकरी,कार्यकर्त्यांनी सुरुवात केली. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही शिवसेना जिंदाबादचे नारे सुरू केल्याने रावते येथून परत गेले.