अकाेला : गत सहा महिन्यांपासून बंद असलेली वाचनालये १५ ऑक्टाेबरच्या वाचन प्रेरणा दिनापासून सुरू झाली; परंतु कोरोनाची धास्ती कायम असल्याने अनेक वाचनालयांमध्ये वाचकांची पावले सावधगिरीने पडत आहेत. साेमवारी शहरातील काही वाचनालयांची पाहणी केली असता, वाचकांचा किरकोळ अपवाद वगळता अनेक वाचनालयांमध्ये वाचक येत नसल्याचे दिसून येते.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन असून, या लॉकडाऊनचा फटका इतर क्षेत्राप्रमाणेच सार्वजनिक ग्रंथालयांनादेखील बसला. तब्बल सात महिन्यांनंतर गुरुवारी वाचन प्रेरणा दिनाच्याच मुहूर्तावर ग्रंथालये खुली झाली. राज्यात सुमारे १२ हजार १४९ ग्रंथालयांचे जाळे आहे. या ग्रंथालयांच्या माध्यमातून ग्रामीण भागातही मोठी सांस्कृतिक चळवळ उभी राहिली आहे. कोरोनाच्या काळात संसर्ग टाळण्यासाठी ग्रंथालये बंद करण्यात आली होती, त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रंथालय संचालकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील ९० टक्क्यांहून अधिक ग्रंथालयांना गेल्या आर्थिक वर्षात केवळ ५० ते ६० टक्केच अनुदान मिळालेले आहे. दुसरीकडे कोरोनाचे संकट अजून कायम असल्याने वाचक पूर्वीप्रमाणे वाचनालयात येत नसल्याचे दिसून येते. काही वाचनालयात दोन, तीन वाचक येत असल्याचे दिसून येते. येथील बाबूजी देशमुख वाचनालयाला माेठी परंपरा असून, येथे वाचकांची उपस्थिती जाणवली. हळूहळू वाचनालये पूर्ववत हाेतील, अशी अपेक्षा वाचकांनी व्यक्त केली.
प्रतिबंधात्मक उपाय
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सुरू झालेल्या वाचनालयांमध्ये काेराेना प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी केली जात आहे. वाचनालयांचे निर्जंतुकीकरण , सॅनिटायझर, तापमान मोजण्याची मशीन, फिजिकल डिस्टन्सिंगची व्यवस्था वाचनालयांतर्फे करण्यात आली.