अकोला : दिव्यांगत्वामुळे सामान्यांसारखे शिक्षण घेणे अवघडच; पण कुणी आधार दिला, तर त्यांनाही त्यांचे स्वप्न साकार करता येते, हाच आधारवड होऊन वाचक, लेखनिक बँकेच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणाई समोर येत आहे. ज्यांच्या मदतीने शेकडो दिव्यांग विद्यार्थी महाविद्यालयीन परीक्षा देत आहेत.वाचक, लेखनिकअभावी दिव्यांग विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, म्हणून दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे वाचक, लेखनिक बँकेची निर्मिती केली. दिव्यांग आर्ट गॅलरीच्या मदतीने काही महाविद्यालयीन युवक या मोहिमेत सहभागी झाले. पाहता पाहता जिल्ह्यातील वाचक, लेखनिकांची संख्या १५० वर पोहोचली. परीक्षापूर्व काळापासूनच या तरुणाईने दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत अभ्यास केला अन् महाविद्यालयीन परीक्षेत अमरावती विद्यापीठातील ७० पेक्षा जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. अमरावती विभागातील नव्हे, तर राज्यभरातील विद्यापीठाच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही वाचक, लेखनिक बँक मोठा आधारवड ठरली. महाविद्यालयीन परीक्षेसोबतच येत्या जून महिन्यात होऊ घातलेल्या विविध स्पर्धा परीक्षेसाठीही दिव्यांग विद्यार्थ्यांना वाचक, लेखनिकांची मोठी मदत होणार आहे.दोन महिन्यांत राज्यभरात विस्तारअकोल्याच्या दिव्यांग आर्ट गॅलरी अंतर्गत सुरू झालेल्या वाचक, लेखनिक बँकेने गत दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात विस्तार केला आहे. यामध्ये प्रामुख्याने अमरावती, लातूर, नागपूर, वाशिम, पुणे, बार्शी (सोलापूर) आणि औरंगाबाद येथे वाचक, लेखनिक बँकेच्या शाखा स्थापन केल्या आहेत.राज्यात ७७० वाचक, लेखनिकवाचक, लेखनिक बँकेच्या माध्यमातून राज्यभरातील महाविद्यालयीन तरुणाई दिव्यांगांच्या मदतीला येत आहेत. याच माध्यमातून राज्यात ७७० वाचक, लेखनिकांची नोंद करण्यात आली असून, ते महाविद्यालयीन परीक्षेसोबतच स्पर्धा परीक्षेसाठी दिव्यांगांना मदत करीत आहेत.मदतीसोबत रोजगारहीवाचक, लेखनिक बँकेच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाईला रोजगाराचीही संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने बँकेतर्फे नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येत आहे. ज्या दिव्यांगांना स्वत:चे पुस्तक, कवितासंग्रह किंवा इतर साहित्य तयार करायचे आहे, त्यांच्यासाठी बँकेच्या माध्यमातून वाचक, लेखनिक पुरविण्यात येत आहेत. या माध्यमातून या महाविद्यालयीन तरुणाईला रोजगाराचीही संधी उपलब्ध होत आहे.वाचक, लेखनिक बँकेच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळाला आहे. शिवाय, जी तरुणाई वाचक, लेखनिक म्हणून कार्य करीत आहे. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.-प्रा. विशाल कोरडे, संस्थापक अध्यक्ष, दिव्यांग आर्ट गॅलरी, अकोला.