अकोला : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या विविध समस्या निकाली काढण्यासाठी गठित केलेल्या समितीने प्रकरणे निकाली काढण्याला सोमवारी सुरुवात केली. त्यानुसार विविध प्रकरणांत कार्यवाहीसाठी पथकातील अधिकारी-कर्मचारी कामाला लागले आहेत.पालकमंत्री शिक्षक समस्या अभियानांतर्गत हा उपक्रम सुरू झाला आहे. त्यामध्ये आस्थापनाविषयक प्रश्नांबाबत तक्रार निवारण अभियान २ ते १० सप्टेंबरदरम्यान राबविले जाणार आहे. त्यानंतर विशेष शिक्षक दरबार घेतला जाणार आहे. त्यामध्ये प्राप्त अर्जांचे वर्गीकरण करून याद्या तयार करणे, त्यावर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. विशेष म्हणजे, त्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. समितीचे सदस्य सचिव म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग तर सदस्य म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी आहेत. त्यामध्ये डीसीपीएस कपातीचे पत्र देणे, पदोन्नती, चटोपाध्याय वेतनश्रेणी, मूळ सेवा पुस्तक अद्ययावत करणे, निलंबन काळाबाबत निर्णय घेणे, शिक्षकांना ओळखपत्र देणे, यासह विविध मुद्यांचा समावेश आहे. वेतन दरमहा ३ तारखेपर्यंत देण्याचा आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीकडून शाळा दुरुस्तीसाठी ११ कोटी रुपये निधी प्राप्त आहे. आणखी ५ कोटी ५० लाखांची निधी मिळणार आहे. त्यातून जिल्हा परिषदेच्या शाळांची खासगी शाळांसोबत असलेल्या स्पर्धेसाठी सहकार्य मिळणार आहे. अभियान काळात केलेल्या कामांची यादी, आदेश ११ सप्टेंबर रोजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते प्रसिद्ध केल्या जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांनी विविध मुद्यांवर कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.