- सचिन राऊत
अकोला : अन्न व औषध प्रशासनाने १ ऑक्टोबरपासून मिठाईच्या ट्रेसमोर किंवा काचेच्या काउंटरवर बेस्ट बिफोर (किती दिवसात खावी) लिहीणे बंधनकारक केले आहे. मात्र या नियमांची मिठाई विक्रेते व ग्राहकांना माहितीच नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. अकोला शहरासह तालुक्याच्या ठिकाणावरील मिठाई दुकानांवर बेस्ट बिफोर लिहीलेले आढळले नसले तरी ग्राहकांनी मात्र मिठाई खरेदीसाठी गर्दी केली होती.
खुली तसेच सुट्या स्वरूपातील मिठाई खाऊन विषबाधा होत असल्याचे प्रकार घडत आहेत. याच प्रकारामुळे केंद्रीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने दुकानांमधील मिठाई किती दिवसात खावी याची माहिती लिहीणे मिठाई विक्रेत्यांना बंधनकारक केले आहे. प्राधिकरणाने या संदर्भातील आदेश २५ सप्टेंबर रोजी देऊन १ ऑक्टोबरपासून या नियमांची अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी आणखी एक आदेश काढत हा नियम केवळ भारतीय मिठाईलाच असल्याचे स्पष्ट केले. मिठाई कधी खावी याची माहिती स्थानिक भाषेत लिहीण्यास सवलत देण्यात आली आहे. मिठाईचे स्वरूप त्यात वापरण्यात येणारे साहित्य आणि स्थानिक वातावरण यावर ती मिठाई किती दिवस राहते हे लक्षात घेऊन बेस्ट बिफोर लिहीण्याचे सांगितले आहे. त्यामुळे या नियमांची अंमलबजावणी करण्यात येते किंवा नाही या संदर्भात ‘लोकमत’ने पाहणी केली असता शहरातील एकाही दुकानामध्ये बेस्ट बिफोर लिहीले नसल्याचे दिसून आले. तर मिठाई विक्रेते आणि ग्राहक या नव्या नियमांपासून अनभिज्ञ असल्याचेही ‘लोकमत’च्या पाहणीत स्पष्ट झाले.
कोणती मिठाई कीती दिवसात खावी?
- दुधापासून बनविलेला पेढा २ दिवस
- अधिक साखर टाकलेला पेढा १० दिवस
- बेसनापासून तयार केलेली मिठाई १५ दिवस
- खव्यापासून बनविलेले पेढे ६/७ दिवस
- दुधापासून बनविलेले मिल्क केक बर्फी २ दिवस
- ड्रायफ्रुट मिठाई ७/८ दिवस
मिठाई विक्रेत्यांची एक बैठक घेउन त्यांना नवीन नियमांची माहिती देण्यात आली आहे. मात्र लॉकडाउनमुळे बंद असलेल्या मिठाई विक्रेत्यांनी आता या नवीन नियमांची अंमलबजावणी सुरु केली आहे.काही दिवसातच प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे फलक लावलेले दिसणार आहे. अन्यथा त्यांच्यावर कठोर करवाई करण्यात येणार आहे.
- रावसाहेब वाकडे, अन्न निरीक्षक, अकोला