मळसूर: पातूर तालुक्यातील मळसूर येथील आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन बाजारात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.
मळसूर येथील बाजारात परिसरातील १० ते १५ खेड्यांतील ग्रामस्थ येतात. गत काही दिवसांपासून बाजारात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. बाजारात सर्वत्र कचरा दिसून येत आहे. घाणीमुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी येत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.
सद्यस्थितीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असे असताना बाजारातील घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. बाजारात असलेल्या अस्वच्छतेमुळे भाजीपाला विक्रेते, दुकानदार व ग्राहक त्रस्त झाले आहेत. परिसरात डासांचे प्रादुर्भाव वाढल्याने अनेकांना डेंग्यूसदृश्य आजार होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन ग्रामपंचायत प्रशासनाने बाजारातील व गावातील स्वच्छता करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (फोटो)
--------------------------------------------
आठवडी बाजारात बऱ्याच दिवसांपासून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. दुर्गंधीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
- शुभम थिटे, प्रहार सेवक, मळसूर.