अकोला जिल्हा : तपासणीसाठी जातोय वेळ
अकोला : राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच आंतरजिल्हा बंदी असल्याने आता जिल्हा बाहेर प्रवास करण्यासाठी पास आवश्यक करण्यात आली आहे. मात्र या ई-पाससाठी दोनच कारणे सांगितली जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येक जण रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार हे दोनच कारणे पास काढण्यासाठी देत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे, तर काहीजण विवाह समारंभ व सोयरीकचे कारण समोर करीत आहेत.
कोरोना रुग्णांचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे ऑक्सिजनअभावी अनेकांचे प्राण गेलेले आहेत. कोरोनाचे हे संकट रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदी मध्ये आंतरजिल्हा प्रवासासाठी पास बंधनकारक करण्यात आली आहे; मात्र या पाससाठी खोटी आणि चुकीची कारणे देत असल्याने त्याची तपासणी करण्यासाठी २४ तासांचा अवधी घेण्यात येत आहे. यादरम्यान पाससाठी खरे कारण सांगण्यात येत आहे का नाही हे तपासण्यात येत आहे. रुग्णालय किंवा अंत्यसंस्काराचे कारण सांगण्यात येत आहे. मात्र पोलिसांकडून रुग्णालयाचे कारण सांगणाऱ्यांना दस्तावेजांची मागणी करण्यात येत आहे; मात्र अंत्यसंस्काराचे कारण देणाऱ्यांना काय दस्तावेज मागावे, असा पेचही पोलिसांसमोर उभा ठाकला आहे.
आठ दिवसांत ४,३५७ आले अर्ज
आठ दिवसांत ३,९४० दिलेल्या पास
प्रलंबित पास ४१७
ही कागदपत्रे हवीत
इ पाससाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी काही कागदपत्रे बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार आधार कार्ड, फोटो, ज्या रुग्णालयात चाललेत या रुग्णालयाचे प्रमाणपत्र, कोरोनाची टेस्ट केल्याचा अहवाल, नाव व मोबाइल क्रमांक बंधनकारक आहे. तसेच या सर्व दस्तावेजांची फाइल ही २०० केबिच्या आतमध्ये असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर टोकण इशू करण्यात येते व २४ तास तपासणी केल्यानंतर पासला मंजुरी देण्यात येते.
२४ तासांत मिळते ई-पास
ई-पाससाठी दिलेल्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर अर्ज सादर झाल्याचे एक टोकन देण्यात येते. त्यानंतर पासला मंजुरी देण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात येते. २४ तासांच्या आत ही पास आपल्या दिलेल्या मेल आयडीवर पाठविण्यात येते; मात्र काही त्रुटी असल्यास पास मिळत नसल्याची ही माहिती आहे.
ई-पाससाठी असा करावा अर्ज पोलीस प्रशासनाकडून ई-पाससाठी एक लिंक देण्यात आलेली आहे. या लिंकवर गेल्यानंतर आपले नाव, गाव, पत्ता व मोबाइल नंबर टाकावा. त्यानंतर आधार कार्ड व फोटो अपलोड करावे. ही प्रक्रिया झाल्यानंतर पास देण्याची प्रक्रिया सुरू होते.
ई-पाससाठी कारणे तीनच
ई-पाससाठी अर्ज सादर करण्यासाठी नागरिकांकडून तीनच कारणे देण्यात येत आहेत. यामध्ये रुग्णालयात जाण्याचे कारण पहिल्या क्रमांकावर असून, दुसऱ्या क्रमांकावर अंत्यसंस्काराचे कारण देण्यात येत आहे, तर विवाह सोहळा व सोयरीकचे कारण देण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.