अकाेट : अकोट-दर्यापूर रोडवरील श्री शिवाजी महाविद्यालयासमोरील नाली बांधकामासाठी तोडलेला प्रवासी निवारा पुन्हा उभारण्यात यावा, अशी मागणी अकाेट उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
तत्कालीन आमदार स्व. रामेश्वर कराळे यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारलेला प्रवासी निवारा शहरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी बांधकाम केलेल्या नालीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तोडला होता. नालीचे बांधकाम पूर्ण हाेऊन एक वर्षाचा कालावधी लोटला, मात्र बांधकाम विभागाने तोडलेला प्रवासी निवारा पुन्हा बांधला नाही. या निवाऱ्यालगत काहींनी अतिक्रमण करण्याचा प्रकारसुद्धा सुरू केला. हा निवारा शिवसेनेचे नगरसेवक दिलीप मोगरे यांच्या प्रयत्नाने बांधला होता. प्रवाशांची या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. विद्यार्थीही याच मार्गाने महाविद्यालयात जाणे-येणे करतात. नागपूर, अमरावती, दर्यापूर येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी हा निवारा महत्त्वाचा आहे. तरी हा निवारा पुन्हा उभारण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सचिव नागेश आग्रे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. निवेदनावर इरफान खान समंदर खान, युवक राष्ट्रवादी शहराध्यक्ष जमीर एकबाल, सरचिटणीस कैलास थोटे, सेवादलाचे नेते हरिदास दहीभात, तोसिफ खान, प्रदीप पायघन, मिलिंद पुंडकर, विजय हाडोळे आदींच्या सह्या आहेत.