ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 21 - कापड बाजारातील भारत कॅप डेपोसमोरून स्थानिक गुन्हे शाखेने 18 जानेवारीच्या मध्यरात्री दोन व्यापा-यांकडून सुमारे 21 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आयकर खात्याला पत्र दिले आहे; मात्र व्यापा-यांनी अद्यापही या रकमेचे दस्तावेज सादर केले नसल्याची माहिती आहे.
कापड बाजारातून स्थानिक गुन्हे शाखेने आदर्श कॉलनी येथील रहिवासी हिरा वाधवाणी आणि राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी गिरीधर अग्रवाल या दोन व्यापा-यांकडून तब्बल 21 लाख 47 हजार रुपयांची रोकड जप्त केली होती. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गुन्हे शाखा पोलिसांनी ही कारवाई केली होती.
सदर रक्कम कोठून आणली, यासंदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे; मात्र नेमकी माहिती पोलिसांना मिळाली नसल्याने त्यांनी आयकर खात्याला या रक मेसंदर्भात पत्र लिहून विवरण मागविले; मात्र त्यानंतरही दोन्ही व्यापा-यांनी अद्यापही ही माहिती सादर केली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात रणजितसिंह ठाकूर, नितीन ठाकरे, जितेंद्र हरणे, शेर अली, अमित दुबे, संदीप काटकर यांनी केली होती.
एलसीबीची मोठी कारवाई
नोटाबंदीनंतर पोलिसांनी नाकाबंदीत 4 ते 5 वेळा रोकड जप्त केली; मात्र ही रक्कम 10 लाख रुपयांच्या आतमध्ये होती. स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल 21 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. यामध्ये सर्वात मोठी कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेची असल्याची माहिती सूत्रांनी दिली.