अकोला : गत आठवडाभरापासून अकोल्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांत कोविड लसीचा तुटवडा असल्याने बहुतांश लसीकरण केंद्रे बंद पडली होती. लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण मोहीम ठप्प पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना सोमवारी विभागासाठी कोविशिल्डचे ९९ हजार डोस प्राप्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला. यामध्ये सर्वाधिक २५ हजार डोस बुलडाणा, तर सर्वात कमी १५ हजार डोस अकोला जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले आहेत.
कोविड लसीचा साठा संपल्याने अकोल्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांतील लसीकरण ठप्प पडण्याच्या मार्गावर होते. पाचही जिल्ह्यांतील अनेक लसीकरण केंद्रे पूर्णत: बंद करण्यात आली होती. काही केंद्रांवर एक ते दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा उपलब्ध होता. यामध्ये काही ठिकाणी कोविशिल्ड, तर काही ठिकाणी कोव्हॅक्सिनचा साठा उपलब्ध नसल्याने अनेकांना दुसरा डोस घेणे शक्य झाले नाही. अशा परिस्थितीत सोमवारी कोविशिल्डचे ९९ हजार डोस विभागासाठी उपलब्ध झाल्याने मोठा दिलासा मिळाला. लसीचा साठा उपलब्ध होताच सोमवारी दिवसभरात विभागातील पाचही जिल्ह्यांना लसीचे वितरण करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्हानिहाय वितरण
अकोला - १५०००
अमरावती - २००००
बुलडाणा - २५०००
वाशीम - २००००
यवतमाळ - १९०००