अकोला : यंदा खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेत केवळ १ रुपयामध्ये सहभाग घेता आला. परिणामी, यंदा आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडून काढीत शेतकऱ्यांनी विक्रमी सहभाग नोंदविला. यंदा रब्बी हंगामात दि. १४ डिसेंबरपर्यंत तब्बल ९१ हजार ७४२ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला असून, गतवर्षी केवळ १४ हजार २४९ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता.
पेरणीपासून पीक काढणीपर्यंतच्या कालावधीत गारपीट, अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळ, पावसातील खंड आदी नैसर्गिक संकटांमुळे पीक उत्पादनाची हानी होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारकडून पीकविमा योजना राबविण्यात येते. यंदा पीकविमा योजनेकरिता नोंदणीकृत शेतकऱ्यांचा विमा हप्ता राज्य सरकार भरत असल्यामुळे योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एका रुपयात नोंदणी करता येत होती. परिणामी, यंदा रब्बी हंगामात ९१ हजार ७४२ शेतकऱ्यांची विक्रमी नोंदणी झाली आहे. पीकविमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांकडून १ हजार ९४९, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांकडून १ लाख ३२ हजार १६६ नोंदणी केल्या आहेत.
१.४४ लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित
यंदा रब्बी हंगामात विक्रमी ९१ हजारांवर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून, तब्बल १ लाख ४४ हजार ४७४ हेक्टर क्षेत्रावरील पिके संरक्षित केले आहे. यंदा पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. भरपाई म्हणून विमा कंपन्यांकडून २५ टक्के अग्रीम रक्कम दिली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा रब्बी हंगामातील पिकांसाठी पीकविमा नोंदणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पीक शेतात बहरलेले असताना, अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे नुकसानाची पुर्वसूचना केली असून, भरपाई देण्याची मागणी केली आहे.