अकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला ब्रेक लागल्यानंतर सध्या वापरात असलेल्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांची दुरुस्ती कंत्राटदार कंपनीऐवजी शासनानेच करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, कामाचा खर्च कंपनीकडून वसूल करण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केली आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण सुरू झाले. अमरावती ते चिखलीपर्यंत १९४ किलोमीटरचे काम चार टप्पे करण्यात आले. त्यातील अमरावती-खामगाव-चिखली या टप्प्याचे काम गेल्या जूनपासून बंद आहे. यादरम्यान, कंत्राटदार कंपनीने तुकड्यातील कामे उपकंत्राटदारांना दिले आहेत. वेगवेगळ्या उपकंत्राटदारांकडून चौपदरीकरणाचे काम सुरू होते; मात्र जूनपासून रस्त्याच्या कामाची गती मंदावली. कंत्राटदार कंपनीला बँकांकडून निधी उभारणे अशक्य झाले. कंत्राटदार कंपनीचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत झालेल्या करारनाम्यानुसार मे २०१९ च्या मुदतीत काम पूर्ण बंधनकारक आहे. ठरवून दिलेल्या मुदतीत दोन टप्प्यातील कामे ठरलेल्या काही प्रमाणात अपूर्ण आहेत. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवून त्या-त्या ठरावीक मुदतीत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे. कामाच्या गतीबद्दल शासनाला कळविण्यात आले आहे. त्याशिवाय, दरमहा कामाचा प्रगती अहवालही शासनाला पाठविला जातो. दरम्यान, वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडलेले आहेत. ते दुरुस्त करण्याची जबाबदारी कंत्राटदार कंपनीची आहे. कंपनीने कामच बंद केल्याने खड्डे कोण बुजविणार, या मुद्यावर शासनाने मार्ग काढला.- दोन टप्प्यातील कामांची निविदाराष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे बुजविण्यासाठी शासनाने निविदा प्रसिद्ध केली. त्यामध्ये अमरावती ते व्याळा आणि तेथून चिखलीपर्यंतच्या कामाचे दोन टप्पे आहेत. त्यासाठी २.२५ कोटींपेक्षाही अधिक खर्च होणार आहे. हा खर्च शासन कंत्राटदार कंपनीकडून वसूल करणार आहे, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती विभागाचे कार्यकारी अभियंता विलास ब्राम्हणकर यांनी सांगितले.- ६४ पुलांचे बांधकाम अर्धवटअमरावती-मूर्तिजापूर-बोरगाव मंजू परिसरात लहान पुलांची निर्मिती होत आहे. चिखलीपर्यंत १४ लहान पूल बांधले जाणार आहेत, त्यानंतर वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून लवकरच आणखी ५० पुलांची निर्मिती होणार आहे. ती सर्व कामे अर्धवट असल्याने त्यातूनही अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. त्या खोदकामाच्या सभोवती वाहनधारकांसाठी संरक्षक उपाययोजना करण्याची गरज आहे.