अकोला: पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेने रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत शहरात विविध भागात कारवाईचा धडाका लावला आहे. गत चार दिवसांमध्ये पोलिसांनी २२00 वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून साडेचार लाख रुपयांचा दंड वसूल केला, अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी दिली.पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. २८ ते ३१ डिसेंबर या चार दिवसांमध्ये वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वात वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी व इतर पोलीस ठाण्यांच्या कर्मचाºयांनी शहरातील प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली. दुचाकी, चारचाकी वाहनांची कागदपत्रे नसणे, परवाना नसणे, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट वाहन चालविणे आदी वाहनांमधून नियमांचे उल्लंघन करणाºया २२00 वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून एकूण ४ लाख ५२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम जानेवारी महिन्यातसुद्धा राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)