लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : बाळापूर नगरपरिषदेच्या २००३, ०४, ०५ मध्ये देखभाल दुरुस्तीसाठी दिलेल्या कंत्राटात ७ लाख ३८ हजार रुपयांची अनियमीतता आढळली होती. हा प्रकार लेखा परिक्षकाने उघडकीस आणला होता. त्यावर कुठलीही कारवाई झाली नव्हती. तपासणी समितीच्या अहवालावर विभागीय आयुक्तांनी तत्कालीन नगराध्यक्षासह मुख्याधिकारी, २० नगरसेवक व इतर कर्मचाऱ्यांना अनियमितेतची रक्कम वसुलीसाठी नोटीस बजावली आहे. या प्रकरणी २२ मे रोजी सुनावणी होणार आहे. नगर पालिकेत २००३, ०४, ०५ मध्ये विद्युत देखभाल दुरुस्तीसाठी दिलेल्या कंत्राटामध्ये अनियमितता आढळली होती. याबाबत लेखा परीक्षकाने हा प्रकार उघडकीस आणला होता. यावर सभागृहात चर्चा करून त्याची पूर्तता करून अहवाल संबंधित विभागाकडे पाठवून तो नियमित करणे अपेक्षीत होते. मात्र, तत्कालील नगराध्यक्षा रजिया बेगम खतीब, उपाध्यक्ष उमेशआप्पा भुसारी, माजी उपाध्यक्ष किशोरचंद्र गुजराथी व २० नगरसेवक, तत्कालीन न. प. मुख्याधिकारी व्ही. एम. लाडसांवगीकर, पी. एम. शेळके, डी. आर. गांधी, अकाउंटंट एम. आर. ताहेर, मुख्य लिपिक श्रीकृष्ण उमाळ यांनी त्यावर कुठलीही कारवाई केली नाही.हे प्रकरण तसेच प्रलंबीत पडून होते. जानेवारी २०१७ मध्ये नगर पालिका कार्यालयाची तपासणी समितीच्या माध्यमातून करण्यात आली. या समितीने हे प्रकरण पुन्हा आयुक्तांकडे सादर करून वसुलीचे आदेश देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार अमरावती विभागीय आयुक्तांनी वसुलीसाठी नोटीस बजावली आहे. या नोटीसवर १७ माच ला सुनावणी झाली असून पुढील सुनावणी २२ मे रोजी होणार आहे. यातील तत्कालीन दोन न. प. मुख्याधिकारी व अकांउटंट व मुख्य लिपिक सेवानिवृत्त झाले तर एक न. प. मुख्याधिकारी नगरविकास विभाग सोडून इतर विभागात कार्यरत आहे. दोन नगरसेवकांचे निधन झाले. माजी नगराध्यक्षा रजियाबेगम खतीब व माजी न. प. उपाध्यक्ष किशोरचंद्र गुजराथी सध्या नगरसेवक आहेत. त्यावेळी माजी नगराध्यक्षा रजियाबेगम खतिब सरळ मतदारातून विजयी झाल्या होत्या तर माजी आ. एस. एन. खतीब हे विधान परिषद सदस्य होते. विभागीय आयुक्तांना ७ लाख ३८ हजार रुपये वसुली पत्र रक्कमेसाठी नगराध्यक्षा, तत्कालीन मुख्याधिकारी, न. प. सभागृहातील २२ सदस्य, मुख्य लिपिक, अकाउंटंट यांचेवर एकसारखी जबाबदारी टाकण्यात आली आहे.
अनियमीततेची सात लाखांची रक्कम होणार वसुल
By admin | Published: May 19, 2017 8:03 PM