संदीप वानखडे
अकोला : गेल्या दोन वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेल्या शिक्षक भरतीसाठी अखेर मुहूर्त सापडला असून, येत्या ९ आॅगस्टला सायंकाळी ५ वाजेनंतर मुलाखतीशिवायची निवड यादी पवित्र पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे. १६ आॅगस्टला सायंकाळी ५ वाजेनंतर मुलाखतीसहची निवड यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवणाऱ्या ८५ हजार उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. निवड यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी ‘लोकमत’ला दिली.
जून २०१९ पर्यंत शिक्षक भरतीपूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन पूर्णपणे फसल्यानंतर जुलैअखेर केवळ तारीख मिळाल्याने उमेदवारांमध्ये रोष होता. २२ मेपासून प्रत्यक्षात प्राध्यान्यक्रम भरण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा १ जूनपासून प्राधान्यक्रम उमेदवारांना उपलब्ध करून दिले. ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरले नाही, त्यांच्यासाठीही ते तीन दिवस उपलब्ध करून देण्यात आले. पोर्टलवरील जाहिराती मराठा आरक्षणाच्या १६ टक्क्यांनुसार प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या; मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार मराठा आरक्षण १३ टक्के व दिव्यांगांनाही आरक्षण देण्याचा निर्णय झाल्याने शिक्षक भरती लांबली होती.