अकोला: गुढी म्हणजे विजय आणि स्वागताचे प्रतीक. उंच बांबूपासून गुढी तयार केली जाते. बांबूच्या वरच्या टोकाला रेशमी कापड, कडूलिंबाची डाहळी, फुलांचा हार आणि साखरेच्या गाठींची माळ बांधून त्यावर धातूचे भांडे बसविल्या जाते. नंतर गुढी पाटावर उभी केल्या जाते; मात्र हे सर्व पहाटे उठून सर्व तयारी करावी लागते. यासाठी आताच्या धावपळीच्या युगात गुढी उभारण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने आणि फ्लॅट संस्कृती फोफावत असल्याने जागेच्या अभावामुळे रेडिमेड गुढीचा नवा ट्रेण्ड अकोल्यातही रुजत आहे.मागील एक-दोन वर्षापासून मुंबई-पुण्यातील बाजारपेठेत दिसणारी रेडिमेड गुढी यंदा अकोल्यात पोहचली. मागील वर्षी अकोल्यातील संस्कृती संवर्धन समितीच्या पदाधिकार्यांनी रेडिमेड गुढी शहरातील गणमान्य नागरिकांना भेट स्वरू प देण्याकरिता मुंबईहून आणल्या होत्या. यामुळे अकोलेकरांना रेडिमेड गुढीचे कुतूहल वाटले होते. यावर्षी थेट बाजारपेठेतच उपलब्ध झाल्याने बर्याच हौशी लोकांनी रेडिमेड गुढय़ा खरेदी केल्या; मात्र ग्राहकांना याबाबत पुरेशी माहिती नसल्याने मागणीही कमी होती. अत्यंत कमी किमतीत ६५ ते २५0 रुपयांपर्यंत विविध आकाराच्या गुढय़ा बाजारात उपलब्ध आहेत.पाट आणि त्यावर असलेले नक्षीदार कापड, नारळ, तांब्या, आंब्याची पाने, गुढीभोवती असलेले रेशमी कापड, हार आदी सर्व साहित्याचा समावेश या छोट्या गुढीत पाहायला मिळतो. त्यामुळे या सगळ्य़ा साहित्याची जमवाजमव करण्यापेक्षा या रेडिमेड गुढय़ा घेण्याकडेच आता लोकांचा कल वाढत आहे. सुंदर नक्षीकाम, चमकदार कापड व आकर्षक सजावटीमुळे या मनमोहक रेडिमेड गुढय़ा खरेदी करण्याचा मोह नागरिकांना सहज होतो. साधारण एक फूट उंचीची असलेली ही गुढी घरात कोठेही सहज ठेवता येते. देवघरातही ठेवून या गुढीची पूजा केल्या जाऊ शकते.
रेडिमेड गुढीचा ट्रेण्ड रुजतोय!
By admin | Published: April 08, 2016 2:12 AM